Tuesday, February 15, 2011

एकला चालो रे!




तरू चालायला लागला त्या गोष्टीला फार दिवस नाही झाले अजून.
पण आता तो इतक्या ऐटीत चालतो की बघत रहावं.
भीती वाटतेच कारण वेगात चालतो.
हात धरलेला तर आवडत नाही.
मला वाटतं लहान मुलांना नाहीच आवडत.
आईच्या ऑफिसात रस्ता इतका छान होता,
तरुला थांबवण अवघड होतं.
सोबत कुणी आहे नाही इकडे त्याचं मुळीच लक्ष नव्हतं.

Monday, February 14, 2011

झाडावर घर!





तरू गेलेला आईच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी.
पहिल्यांदाच.
आजी पण होती बरोबर.
‘मला घरी ठेऊन रोज सकाळी आई इथे येते’
हे त्याला आजच कळत होतं.
छानच वाटलं आईचं ऑफिस!
आई, आजी सगळं फिरून बघत होत्या.
तरू तर ऐटीतच होता.
फुलं,गवत,बाग,झरे,सगळं निरखून बघत होता.
हरखून जात होता.

आजीनं तर तिथं दाखवलं झाडावर घर!
तरू किती तरी वेळ बघत होता.
‘झाडावर घर!’
पण होतं किती लहान!
आणि गवताचं!!
गंमतच होती भारी.
आजी काय काय सांगत होती,
‘इथं राहते चिमणी.तिचं नाव आहे सुगरण ’
आणखी असंच काहीतरी..
म्हणजे,
‘लहान आहे न, म्हणून त्याला ‘घरटं’ म्हणतात वगैरे..
त्या दिवशी घरी आल्या आल्या
तरू बाबाना सांगत होता,
‘ आम्ही आईच्या ऑफिसमध्ये घरटं बघितलं! ’

नंतर एकदा तरू बाबांच्याही ऑफिसमध्ये गेलेला.
पण तिथं गेला रात्रीचा. एकतीस डिसेंबर २०१०च्या रात्री.
खूपच मजा आली.सगळेच हसत होते.
हसतच बोलत होते.
बाबांच्या ऑफिसचं हॉटेलच झालेलं.
तिथली सगळीच माणसं तरूकडे बघून
सारखी हसत होती.
तिथल्या त्या छान छान मामांनी
तरूला आवडणारं सूप दिलेलं.
तरू म्हणतो, ‘बाबांच्या ऑफिसात सूप! ’

Wednesday, February 9, 2011

दाढी टोचते!




मामा एक तर लवकर भेटत नाही.
खूप जवळ जावून लाड केले मग.
पण कसली टोचली दाढी!
सांगायला पाहिजे त्याला.

बाईक



बाबा बाईक म्हणतात म्हणून
तरू त्याच्या नव्या गाडीला ‘बाईक’ म्हणतो.
बाबांप्रमाणे त्याच्याकडेही आता चाव्या आहेत छान छान!
घरात आता इथून तिथे जायला बाईकच लागते.
लवकर पोहचता येतं ना!

टोमॅटोचं शेत!



टोमॅटो म्हणजे खायचंच.
जितक्या लवकर ते हातात मिळेल तेवढं यावं.
असा विचार करणार्‍या तरुने
फार फार तर दहा-बारा टोमॅटो एकत्र बघितली असणार.
ती बघून
आनंदाच्या उड्या मारणार्‍या तरुला
सगळं शेत भरून टोमॅटो बघितल्यावर
कसली धम्माल मजा वाटली असणार.
पुरंदरच्या सहलीला ही गंमत झाली!

Thursday, December 9, 2010

ती शीळ ओळखीची...


तरू अगदी पहिल्यांदा मला भेटला,
त्यावेळी मी शीळ वाजवून त्याचं मनोरंजन केलं होतं ,
हे मला चांगलंच आठवतंय.
तो त्याचा जन्मदिवस होता.
त्यानेही ओठांचा छान चंबू करून
माझ्या बरोबर शीळ वाजवण्याचा
प्रयत्‍न केला होता.
आतासुध्दा फोन करताच मी शीळ वाजवतो
आणि तरू ओळखतो,
‘आजोबांचा फोन आहे’
त्याची शीळ मला ऐकू येते.
चांगले तीन चार प्रयत्‍न ऐकू येतात.
आता समजतंच की, तरू शीळ वाजवतोय म्हणून.
आणि मग ती मंजूळ आवाजातली हाक ऐकू येते,
आणि मनात पुन्हा पुन्हा वाजत राहते,
"हेलो आज्योबाssss,!!"

तरुला शाळेत जायचंय..





तरू आज दिड वर्षाचा झाला.
गेल्या दोन महिन्यात
तो एवढं काय काय बोलतोय,
खूपच मजा येतेय त्याला ऐकताना.
एक म्हणजे
त्याला किती कळतंय ते समजतंय त्यामुळं.
आणि दुसरं म्हणजे
त्याच्याशी चक्क गप्पा मारता येवू लागल्यायत.
हल्ली तो स्वत:ला मी म्हणायच्या ऐवजी
तरू म्हणून वाक्य बनवत असतो.
म्हणजे,"तरुला झोपायचंय",
"तरुला शाळेत जायचंय " वगैरे.
सगळी मुलं दप्तर घेवून शाळेत जातात,
दप्तरात पुस्तकं असतात,
हे त्याला चांगलं माहित आहे.
बाहेर गेल्यावर शाळा दिसताच
त्याची मागणी सुरू होते.
त्याला आणि खरोखरच
वाचायचं असतं भरपूर.
कुठल्या पुस्तकात काय काय आहे
हे त्याला माहित आहे!
भिंतीवर काढलेल्या आंब्याच्या झाडाजवळ जावून ,
हातात पुस्तक घेवून बसतो
आणि म्हणतो,
"तरू झाडाखाली पुस्तक वाचतोय."