Saturday, June 9, 2012

तुषार मृगाचे.. वाढदिवसाचे..!


आले तुषार मृगाचे
थेंब थेंब आनंदाचे
मेघ धावे, मेघ नाचे
दिस श्यामल छायेचे

आज शांतले मानस
ओल अंतरात दाटे
रोम रोम शहारून
गात रहावेसे वाटे

दिसे पालवीची खूण
सण पावसाळी आज
‘तरू’ नटून,सजून
आहा ! नऊ जून..नऊ जून!!

Sunday, March 18, 2012

तस्सच आहे ना!


अगदी लहान असल्यापासून
तरू सारख्या दिसणार्‍या
गोष्टी शोधून
‘हे तस्सच आहे ना?’
असं म्हणत आला आहे.
त्रिकोण, वर्तुळ,आयत,चौरस,पंचकोन
या आकारांशी त्याने लगेचच गट्टी केली.
झाड,मासे,सूर्य,चंद्र यांची चित्रं तो काढतोच.
एकदा रस्त्यावर पडलेली तार बघून तो म्हणालेला,
"ती मासाच वाटतेय ना?"
आणि खरंच होतं ते!

सांगण्यासारखी गंमत अशी-
तृप्ती मावशीच्या कुरळ्या केसांकडे बघून
तो म्हणाला,
"तुपामाऊचे केस समुद्रासारखे आहेत ना?"
त्याच वेळी त्याचं लक्ष
पूर्वा मावशीच्या सरळ खाली आलेल्या केसांकडे होतं.
आणि म्हणतो कसा,
"पूर्वा मावशीचे केस म्हणजे धबधबाच आहे!"
हे फारच सुंदर निरिक्षण होतं त्याचं.
"आणि तुझे केस रे?"
असं विचारल्यावर म्हणाला,
"माझे तळ्यासारखे आहेत!"
केसांची तुलना पाण्याशी!
आणि
ती ही तंतोतंत!!


Wednesday, February 29, 2012

ही तर घसरगुंडीच आहे!


तरू त्या दिवशी वानरांना बघून आनंदात होता.
आमची गाडी गगन बावडा घाटातून
हळुहळू खाली उतरत होती.
वळणा वळणांचा तो उतार
आपल्याला घाबरवूनच सोडतो.
तरू मात्र मजेत बाहेर बघत होता.
खिडकीतून दिसणारा तो घाट बघून
तो म्हणाला होता,
"ही तर मोठ्या माणसांची घसरगुंडीच आहे!"

Sunday, February 26, 2012

आपल्याला शेपटी आल्यावर मग..

खूप पूर्वीची म्हणजे तरी असेल एक वर्षापूर्वीची ही आठवण. तरूने वानरांची मजा पहिल्यांदाच पाहिली होती त्या दिवशी. आपण इतक्यांदा बघून सुध्दा कंटाळत नाही त्यांच्या त्या झाडावरच्या अफलातून उड्या बघताना. तरू तर काय बघतच राहिला त्यांना! त्याला खूपच आश्चर्य वाटलं वानरांची ती चपळाई बघून. झाडावरून घरावर.घरावरून रस्त्यावर . केवढ्या त्या उड्या! त्या दिवशी संध्याकाळी, एका शांत क्षणी तरू मला म्हणालेला, "आजोबा,आपल्याला शेपटी आल्यावर मग आपल्याला पण झाडावर उड्या मारायला येतील." मला मोठीच गंमत वाटलेली हे ऐकून. मी खूप हसूही शकलो नाही. त्याला काय वाटेल या विचारानं. आपल्याला शेपटी कधी येईल कुणास ठाऊक? तरू तशी वाट बघत असेल का? त्याला लवकरच सांगायला हवं,तसं काही होणार नाही म्हणून!

Thursday, January 26, 2012

मी विंगेतून आलो!

गेल्याच्या गेल्या वर्षी ‘छोटीशी सुरुवात ’या नावाचं नाटक आम्ही केलेलं. तेंव्हा तरूने ते मांडीवर झोपून ऐकलेलं. गेल्या वर्षीचं ‘१२ विरूध्द२१’ हे त्याने बसून बघितलं. आणि नंतर चालायला यायला लागल्यावर आठवून करूनही दाखवलं. मला वाटतं हे मागे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. या वर्षी तर तरूने नाटकात कामही केलं. त्याला रंगमंच,विंगा,स्पॉट,हे कळायला लागलं. येता जाता, आपल्याला हे सगळं कसं माहिती झालंय हे त्याला सगळ्यांना सांगायचंही असायचं. मग तो म्हणायचा, "आई,मी विंगेतून आलो"

Friday, November 11, 2011

" चित्रं काढुया ना.."

रंग, ब्रश, पाणी,आणि कोरा कागद यांची वेगाने मांडणी करून कधी एकदा मनातलं चित्र कागदावर उतरवतोय अशा अवस्थेतला तरू बघायलाच हवा! "आजोबा,चित्रं काढुया ना.." तरू नवनवे फटकारे मारत रोज कितीतरी चित्रं निर्माण करतो आहे. ही चित्रं काढताना सोबत त्यांचं वर्णन करणं त्याला अतिशय आवडतं. "हे मी काहीतरी वेगळंच काढतोय" असं म्हणायला तर खूपच आवडतं. तरुने चितारलेला सूर्योदय,तरुचं फूल आणि मासा इथं वानगीदाखल..

Saturday, October 1, 2011

या झाडाचं नाव काय?

कुठलंही झाड पहिल्यांदा बघताना तरू विचारणारच, "या झाडाचं नाव काय?" त्याच्या या सवयीमुळं कितीतरी झाडं त्याच्या ओळखीची झालीयत. तीच झाडं अनेक ठिकाणी भेटल्यामुळं होणारा आनंद सुध्दा आहेच. सोनचाफा,सोनटक्का अशी नावं घेताना त्याला वेगळीच गंमत वाटत असते. भिंतीवरच्या चित्रातल्या नारळाच्या झाडावर चढून नारळ काढणं तर खूपच आवडीचं काम आहे झाडाचं चित्र काढणं तर सुरूच असतं! केळीच्या पानांनी मोराचा पिसारा तयार केला तर कसा दिसेल? तसंच एक झाड दिसलं तेंव्हा तरुने विचारलेलं, "या झाडाचं नाव काय?" त्याने ते नाव बरोबर लक्षात ठेवलेलं. तेच झाड एकदा सहलीला गेल्यावर दिसलं तेंव्हा तो म्हणालाच, "बनाना पाम!"