Wednesday, March 13, 2013

सिंहाच्या गोष्टीची गोष्ट



पहाटे चार वाजता ऊठून तरुने मला काय सांगावं?
’पप्पा आजोबा ,आपल्या नव्या नाटकाचं नाव काय ठेवायचं
माहिती आहे?"
"काय?"
"सिंहाच्या गोष्टीची गोष्ट"
"हं?"
"आपलं नाटक आहे ना ‘माणसाच्या गोष्टीची गोष्ट’, तसं."
गेले कित्येक दिवस तरुच्या या नव्या नाटकाची रोज तालीम सुरू आहे.
ती कुठल्याही वेळी आणि कुठेही सुरू होते.गरज आहे ती फक्त त्याच्या
शिवाय आणखी कुणीतरी कलाकार उपलब्ध असण्याची.
काहीतरी उंच ठिकाण बघून तरू(म्हणजे नाटकातला सिंह!)
‘सिंहासनावर’ बसतो आणि समोरच्याला विचारतो,
"काय प्रश्‍न आहे तुमचा?"
या प्रश्‍नाची आम्हाला आता एवढी सवय झालीय आणि इतक्यांदा तो ऐकलाय,
आम्ही सुध्दा तो अवघडात अवघड कसा असेल हेच बघतो.
आणि मग  त्या सिंहाचा चेहेरा बघत बसतो.
किती गंभीरपणे विचार करणं सुरू असतं!
केवढा तरी वेळ शांतता असते. एक ताण वातावरणात भरून राहतो.
आणि मग सिंह त्या प्रश्‍नाचं उत्तर देऊ लागतो.
उदाहरणार्थ-
१.प्रश्‍न: महाराज,माणसं केवढी झाडं तोडतायत! काय करायचं?
 उत्तर:  आपण त्यांना सांगायचं,"तोडू नका झाडं."
 प्रश्‍न:   कुणीही ऐकत नाही.आपली भाषाच त्यांना कळत नाही.मग?
 उत्तर:  तुम्ही काळजी करू नका.मी फॉरेस्ट ऑफिसरला सांगेन आता.

   २.प्रश्‍न: महाराज,पाऊस गायब झालाय.प्यायला पाण्याचा थेंब नाही.
     उत्तर: हत्तींना बोलावून घ्या.ते लांबून पाणी घेवून येतील.
          आणि सोंडेने पाडतील पाऊस!
३.सिंह: हं कोण तुम्ही?
  ससा: महाराज मी ससा आहे.
  सिंह: हं.काय प्रश्‍न आहे ससुल्या?
  ससा: लपायला जागाच नाही.
  सिंह: बीळात राहतोस ना,तिथंच लपायचं
  ससा: असं कसं.गवत,गाजर काहीतरी खायला बाहेर
       पडायलाच लागणार ना.भीती वाटते खूप.
  सिंह: (खूप वेळ कपाळावर अठ्या,भुवया उंचावलेल्या,शांतता..)
       घाबरू नको. मी आहे.

तर हे असं ..
रोज रोज नवा प्रयोग!  

Saturday, January 26, 2013

पक्ष्यांचे डोळे



‘पक्ष्याचा डोळा’ वगैरे म्हटलं की अजूनही आपल्याला
अर्जुन वगैरे आठवतो.पण अहिंसेच्या विचारांबरोबर
आता या महाभारतातल्या गोष्टी अगदी नाही वाटत
ऐकाव्याशा.तसंच मला ती म्हण नाही ऐकवत..कुठली..
म्हण नव्हे वाक्‌प्रचार..‘एका दगडात दोन पक्षी मारणे’.
असो..सांगायचंय दुसरंच काहीतरी..
त्या दिवशी फोन होता तरुचा;
"पप्पा आजोबा,पक्ष्यांचे डोळे तर
किती बाजुला असतात ना..अगदी गालावर..
(मला हे खूपच आवडलं..गालावर..मला हे अजून
कधी सुचलं नव्हतं.)
"हो.बरोबर आहे.मग?"
"मग त्यांना समोरचं कसं दिसतं?"
प्रश्‍न तर बरोबरच होता.
या वर्षी त्यानं नाटकात कावळ्याचं काम केलं
हे मी तुम्हाला सांगितलंच नाही ना?
नंतर विस्तारानं सांगायला हवं त्याबद्द्ल.
तर पक्ष्यांविषयीचं चिंतन सुरू असणार सतत.
आणि त्यातूनच हा प्रश्‍न सुचला असावा.
"अरे,त्यांची मान कशीही वळते ना,
त्यामुळे मान वळवून ते हवं तिकडं
बघू शकतात.समोर सुध्दा."
त्याला ते पटलंच नीट.
मग लगेचंच ते त्याने रुपालीला छान
समजावून सांगितलं.
पक्ष्यांना समोर बघायला येणार नाही या काळजीनं
त्यानं तो प्रश्‍न विचारला होता.
मला ही करुणेची दृष्टी फार महत्त्वाची वाटतेय.

Friday, January 25, 2013

‘चित्रकार’


"हल्ली त्याच्या छोट्याशा आणि कमी वेळेच्या शाळेत
जाताना तरुला उत्साह तर वाटत नाहीच, उलट रडायला
मात्र येत असतं रोज.मग त्याला रोज रोज समजवायचं तरी
किती हा प्रश्न रुपालीला पडतो.
"हे बघ तरू, अरे शाळेत गेलं तरच कळतं सगळं,
शहाणं होता येतं..डॉक्टर वगैरे शाळेत जावूनच होत येतं."
....असं काय काय..!
त्या दिवशी एका निवांत क्षणी तरू आईला सांगत होता,
"आई,मी मोठा झाल्यावर ‘चित्रकार’ होणार आहे."
"अरे व्वा, छानच."
त्याच्याकडून हे काही ती पहिल्यांदाच नव्हती ऐकत.
त्याच्या मनाचा प्रवास ती नेहमीच शांतपणे समजून घेते.
"आई,पण मला तर आधीच छान छान चित्र येतात काढायला"
हे सुध्दा रुपालीने ऐकलेलं पूर्वी...
पण आज तो काही तरी वेगळंच गणित मांडत होता,
"मग मी कशाला जावू शाळेत ना?"
त्याचं बोलणं अगदीच काही चुकीचं नव्हतं!
रुपालीने मग मावशीचं उदाहरण देवून
"चित्रं आणखी चांगली येण्यासाठी शाळेत जावंच लागतं"
असा शाळेच्या बाजूने जोर लावला.
थोडा वेळ शांततेत गेला खरा.
मग तरूने आणखी एक डाव मांडायला सुरुवात केली.
"आई,तू पण शिक ना चित्रं काढायला."
हो मी पण शिकणार आहे ना."
"मग तू पण बस ना शाळेत माझ्याजवळच.
आपण दोघं ‘चित्रकार’ होऊया!"
यावर मात्र रुपालीची कुठलीच ‘शाळा’ चालली नाही"
मोठ्याने हसून विषय बदलण्याशिवाय आणखी
कोणता पर्याय होता?

Friday, December 7, 2012

देव कुठे असतो?



लहान मुलांसाठी म्हणून लिहिलेल्या पुस्तकांवर विश्वास ठेवून
ती आपण आधी न वाचताच त्यांना तशीच वाचून दाखवणं
कधी कधी आपल्यालाअडचणीत आणू शकतं.
अशाच एका पुस्तकातली गोष्ट तरुला खूप दिवसांपूर्वी वाचून दाखवलेली.
त्यावेळी ‘माणसं वाईट वागली तर देव त्यांना शिक्षा करतो’ असलं
समजावून सांगायला अतिशय अवघड असं वाक्य त्या गोष्टीत होतं.
आज तरुला ते पुन्हा सगळं आठवत होतं आणि तो आईला पुन्हा पुन्हा विचारत होता,
"आई,देव कुठे असतो गं?"
सगळ्यांनाच पडणारा हा प्रश्न तरुला फारच लवकर पडला होता!"
आपणच देव असतो आणि चांगला विचार म्हणजेच देव
हे त्याला कसं सांगावं या विचारात रुपाली असतानाच तिला माझा फोन गेलेला.
मग आम्ही तिघांनी मिळून त्यावर विचार केला.
तेंव्हा "देव दिसत नाही मग तो शिक्षा कशी करतो?"या तरुच्या प्रश्नाने
आम्ही निरुत्तर झालो.
आमची गोची त्याच्या लक्षात आली की काय माहित नाही,
पण तो म्हणाला,"ती गोष्ट आपण पुन्हा नकोच वाचुया.ती वाचलीय आपण पूर्वी."

Sunday, November 11, 2012

‘राजगड’


तरुची आणि अंजोरची अगदी गट्टी आहे.त्यांच्या ‘स्नेह’ नावाच्या शाळेतला हा ‘स्नेही’!
दोघांना सुट्टीत सुध्दा भेटायचं असतं.सकाळी शाळेत,मग संध्याकाळी बागेत दोघे एकत्र असतातच.आणि मग एकमेकांच्या घरी जाणं तर दोघांनाही खूपच आवडतं.
आता दिवाळीच्या सुट्टीत दोघांनी छान किल्ला तयार केलाय.अर्थातच आई बाबा मावळे आणि हे राजे.
तरू तर म्हणतोय,"आमचा ‘राजगड’ आहे.
खरंच राजगडासारखा अवघड आहे बाबा!!

‘मिक्सर’



"तरू,जेवताना घाई नको करूस.प्रत्येक घास खूप वेळ चावायचा.
आणि मग शांतपणे,सावकाश घास गिळायचा."
तरू डाळ भात खाताना रुपाली त्याला समजावत होती.
प्रत्येक वेळी रुपाली असंच काही सांगायला लागली की
तरू अगदी एकाग्र होवून ऐकत राहतो.तिच्या डोळ्यात बघत राहतो.
त्याच्या मनात ते सगळं उतरतंच.
तरुला काही तरी सुचलं होतं.त्याच्या डोळ्यात चमक दिसत होती.
"म्हणजे आई,पोटात भाताचा ‘ज्यूस’च तयार होईल ना?
आई,गंमतच आहे ना आपलं तोंड म्हणजे!"
"म्हणजे रे?" न कळून रुपालीने विचारलं.
"आपण दाताने सगळं बारीक करतो ना,
तोंड म्हणजे मिक्सरच आहे ना!"
दुपारी ज्यूस वगैरे करताना बघतच असतो ना तो.
"बरोब्बर!" रुपालीला सुध्दा मजा वाटली होती.

Friday, November 9, 2012

‘डोंगराची बी’


मधल्या काळात काय काय झालं आणि लिहिणं झालं नाही.
तरुच्या किती गोष्टी नुसत्या मनात गर्दी करून राहिल्या.
... आठवतील तशा रोजच सांगणार आहे.

अगदी गेल्या आठवड्यातली ही गोष्ट.
तरू एखाद्या ठिकाणी टक लावून बघायला लागला की
प्रकाश नारायण संतांच्या लंपनची आठवण
येणार म्हणजे येणारच सोडा!
त्याच्या डोक्यात ‘पतंगाच्या दोर्‍याचा गुंता सोडवण्याचा विचार’
लंपनसारखाच सुरू असतो.सतराशे साठ वेळा तरी त्याला
अगदी जगावेगळे म्हणता येतील असे प्रश्‍न पडतात.
रुपालीला आता त्याच्या अशा प्रश्‍नांचं आश्‍चर्य वाटणं कमी झालंय म्हणा.
पण तो मात्र तिला नेहमीच चकीत करतोच करतो.

लहान मोठ्या डोंगरांकडे बघून तो म्हणालेला..
"लहान डोंगरच मोठे होतात का?झाडासारखे?
आई,डोंगराची पण बी असते का गं?"