Sunday, October 31, 2010

रक्षाबंधन


२००९ मध्ये
पाच ऑगस्टला होती नारळी पौर्णिमा.
तरुसाठी एक छान, छोटीशी,
गुलाबी रंगाची राखी आणलेली.

ओवाळताना त्याचं लक्ष होतं बरोबर.
गेल्या दोन महिन्यात तरुला बघत होतो.
शांतपणे सगळं निरिक्षण करायचं,रडायचं वगैरे नाहीच
.त्याचा स्वभाव आवडत होताच.
खूपच मजा येत होती.

तरूशी आता आमची
चांगलीच ओळख झाली होती जणू.
आम्ही महिन्यांच्या भाषेत
आमचा सहवास मोजत होतो.
पण कधी कधी वाटतं,
ह्याला तर काहीच नवीन वाटत नाही.
आम्ही आधिचेच जोडलेले आहोत.
हे वेगळंच बंधन आहे!
गुलाबी,नाजूक,मऊ,..

एक होती चिमणी, ..







तरुला गोष्ट सांगण्याची केवढी हौस आहे मालनला!
चिमणी आणि कवळ्यांचे आवाज ऐकत ऐकत,
अंगणात सुरू व्हायचा गोष्टीचा तास.
लहान मुलांचं कळत नाही का पण
भारी जमतं तिच्याशी.

तरुला दोन महिने होण्याआधीचे
या दोघांचे गोष्टीत रंगून गेले असतानाचे फोटो बघून
मला नेहमीच खूप आश्चर्य वाटतं.
एवढ्याशा तरुला गोष्ट कळलीच आहे की काय,
अशी शंका यावी असे सुंदर भाव आहेत त्याच्या चेहेर्‍यावर!

पुन्हा पुन्हा तीच गोष्ट तेवढीच कशी रंगते?
त्याच त्या सुंदर जागा..
‘दारावरची टकटक’,
‘चिऊताईचं हात दाखवून,"थांब" म्हणून सांगणं’

शब्द नक्कीच नव्हते कळत
पण त्या ठराविक अंतराने होणारे
हातवारे आवडत असतील.
‘टक टक,थांब ह्या आवाजाची
गंमत वाटत असेल.

आता तर तोच ही गोष्ट तिला ऐकवतोय.
म्हणजे त्यात शब्द भरतोय.
key words!
चिऊताई,कावळेदादा,
शेणाचं,मेणाचं,पाऊस..असे.

तो आता तिला ‘मालन आजी’ म्हणू लागलाय.
फारच मजा वाटते हे फोटो बघताना.

या गोष्टीतलं
चिऊ आणि काऊच्या घरातला फरक,
त्यांचं एकमेकांशी विचित्रं वागणं,
मनात कसेतरीच भाव
निर्माण करीत असतं.
गोष्टी अशाच का असतात?

Tuesday, October 26, 2010

झिम्मा





झिम्मा हा किती गमतीचा खेळ आहे नाही?
आपल्या शरीराचा तोल आणि ताल सांभाळत
गाणं म्हणायचं आणि टाळ्या देत घेत नाचत रहायचं!
मला खूप मजा वाटते अशा टाळ्या वाजवत गाताना.
लहानग्या तरूला नुसतं घेवून बसण्यापेक्षा त्याची
काही करमणूक करत बसायचो आम्ही.

तो अडीच-तीन महिन्याचा असताना तरुबरोबर झिम्मा
खेळायला लागलो.
आमच्या टाळ्या वाजवणं तो बघत होताच.
त्यानेही या खेळात रस घेतला.
तोही हात हलवू लागला.तालात.
त्याच्या बंद मुठीची टाळी हातावर घेताना केवढी मज्जा वाटली.

‘तरू झिम्मा खेळतो’ असं मी सांगायला लागलो ज्याला त्याला.
कुणाला ते खरं वाटत नसे आणि अजूनही वाटत नाही.
मला आणि तरुला मात्र नक्की माहीत होतं ते!
त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं ते.
खरं, मुलांच्या डोळ्यात किती काय काय दिसत असतं.
सगळं समजून घ्यायला हवं.

माऊ ,माऊ,आमची माऊ!





आज आहे तरुलीच्या मावशीचा वाढदिवस.
सव्वा वर्षाच्या तरुनं चक्क
गाणं म्हटलं तिच्यासाठी
आणि ते ही फोनवरनं.
‘माऊ ,माऊ,आमची माऊ!’

शब्दांशी खूप लवकर दोस्ती झालीय त्याची.
आता स्वत: छान वाक्यं तयार करायला लागलाय.
महिन्यापूर्वीच तो एक गाणं शिकला..
‘बाबा,बाबा,आमचा बाबाsss’
(‘नकोरे बाबा’ या प्रसिध्द बालनाट्यातलं)
आता यात स्वत:च काही बदल करून
तो त्याला हवं तसं गाणं तयार करून गातो.
म्हणजे, ‘आई,आई,आमची आई’,‘मामा, मामा,आमचा मामा.’ असं!

तृप्ती मावशीला तो ‘तुपामाऊ’ म्हणतो.
मावशीबरोबर त्याची अगदी गट्टीच आहे.
मावशी कधी आठवड्याभरानं घरी आली
तर महाशय तिला झोपूच देत नाहीत.
मावशी तो लहान असताना रात्र रात्र त्याला
जवळ घ्यायची तेंव्हा तो तिचा हट्ट असायचा.
दुसर्‍या कुणी घ्यायच्या आधी,ती धावत जावून घ्यायची तरुला!

Sunday, October 24, 2010

कोवळे क्षण


लहान बाळाचं बघणं,हसणं,दिसणं
हे आणि हेच असतं सगळ्यांच्या मनात
त्या पहिल्या काही दिवसात.
ते शानुलं,छकुलं बाळ प्रत्येकालाच जवळ हवं असतं.
झोपलं असलं तरी त्याचं झोपेतलं हसणं बघण्यासाठी
त्याच्याकडे नजर लावून बसतात सगळे.
त्याचं भुवई उडवणं,जांभई देणं,मान हलवणं,
सगळ्यावर चर्चा होत असते.
त्याचा मऊ मऊ स्पर्ष
हवा हवासा वाटत असतो.
त्याच्या मुठीत बोट देवून बसावंसं वाटत असतं.
आईसाठी ते सगळे कोवळे क्षण
किती सुखाचे असतील नाही?

Thursday, October 21, 2010

बिन घड्याळाचे दिवस


तरुचा जन्म नऊ जूनचा.
०९/०६/०९.
मृगाचा पाऊस यावा तसा आनंद झाला आम्हाला.
मला चांगलं आठवतंय,
हॉस्पिटलच्या खिडकीतून तरुबाळाला घेऊन
मी मावळतीकडनं येणारे
आणि
अतिशय वेगाने पूर्वेकडे निघालेले
ढग बघत बसलेलो.
कितीतरी वेळ.
ढगांच्या बदलत्या आकारांमध्ये
मला कित्येक त्रिमित चित्रं दिसत होती.
मध्येच
तरूचा खूप वेळ न्याहाळून बघितलेला चेहेरा
पुन्हा पुन्हा
बघत होतो.
किती लाल- गुलाबी,नाजुक होता तो!
कपाळावर गंध लावावा तशी एक गुलाबी जन्मखूण होती.
दोन्ही पापण्यांवर तर तो रंग छानच शोभत होता.
त्या आठ दिवसात आम्ही एकटक त्याच्याकडेच बघत होतो.
जणू सगळी घड्याळं बंदच होती काही दिवस.

Wednesday, October 20, 2010

राष्ट्रकूलनंतरची चर्चा!


नुकताच चालायला शिकला असला
तरी चालण्यापेक्षा तरूला धावणंच जास्त आवडतं.
त्यामुळं सारखं त्याच्या सोबत रहावं लागतं.
आणि तो नेहमीच आपल्यापेक्षा वेगात धावतो!
त्या दिवशी बाबाला हरवलंच त्याने.
हे छायाचित्रं आणखी काय सांगतं?

राष्ट्रकूलमध्ये आपल्याला आणखी एक सुवर्ण पदक सहज मिळणार होतं!
तरूची निवड न केल्यामुळेच ते हुकलं!