Wednesday, February 29, 2012
Sunday, February 26, 2012
आपल्याला शेपटी आल्यावर मग..
खूप पूर्वीची
म्हणजे
तरी असेल एक वर्षापूर्वीची ही आठवण.
तरूने वानरांची मजा पहिल्यांदाच पाहिली होती त्या दिवशी.
आपण इतक्यांदा बघून सुध्दा कंटाळत नाही
त्यांच्या त्या झाडावरच्या
अफलातून उड्या बघताना.
तरू तर काय बघतच राहिला त्यांना!
त्याला खूपच आश्चर्य वाटलं
वानरांची ती चपळाई बघून.
झाडावरून घरावर.घरावरून रस्त्यावर .
केवढ्या त्या उड्या!
त्या दिवशी संध्याकाळी, एका शांत क्षणी तरू मला म्हणालेला,
"आजोबा,आपल्याला शेपटी आल्यावर मग आपल्याला पण
झाडावर उड्या मारायला येतील."
मला मोठीच गंमत वाटलेली हे ऐकून.
मी खूप हसूही शकलो नाही.
त्याला काय वाटेल या विचारानं.
आपल्याला शेपटी कधी येईल कुणास ठाऊक?
तरू तशी वाट बघत असेल का?
त्याला लवकरच सांगायला हवं,तसं काही होणार नाही म्हणून!
Thursday, January 26, 2012
मी विंगेतून आलो!
गेल्याच्या गेल्या वर्षी
‘छोटीशी सुरुवात ’या नावाचं नाटक आम्ही केलेलं.
तेंव्हा तरूने ते मांडीवर झोपून ऐकलेलं.
गेल्या वर्षीचं ‘१२ विरूध्द२१’ हे त्याने बसून बघितलं.
आणि नंतर चालायला यायला लागल्यावर आठवून करूनही दाखवलं.
मला वाटतं हे मागे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे.
या वर्षी तर तरूने नाटकात कामही केलं.
त्याला रंगमंच,विंगा,स्पॉट,हे कळायला लागलं.
येता जाता, आपल्याला हे सगळं कसं माहिती झालंय
हे त्याला सगळ्यांना सांगायचंही असायचं.
मग तो म्हणायचा,
"आई,मी विंगेतून आलो"
Friday, November 11, 2011
" चित्रं काढुया ना.."
रंग, ब्रश, पाणी,आणि कोरा कागद यांची वेगाने
मांडणी करून कधी एकदा मनातलं चित्र कागदावर
उतरवतोय अशा अवस्थेतला तरू बघायलाच हवा!
"आजोबा,चित्रं काढुया ना.."
तरू नवनवे फटकारे मारत
रोज कितीतरी चित्रं निर्माण करतो आहे.
ही चित्रं काढताना सोबत त्यांचं वर्णन करणं
त्याला अतिशय आवडतं.
"हे मी काहीतरी वेगळंच काढतोय"
असं म्हणायला तर खूपच आवडतं.
तरुने चितारलेला सूर्योदय,तरुचं फूल आणि मासा
इथं वानगीदाखल..
Saturday, October 1, 2011
या झाडाचं नाव काय?
कुठलंही झाड पहिल्यांदा बघताना तरू विचारणारच,
"या झाडाचं नाव काय?"
त्याच्या या सवयीमुळं कितीतरी झाडं त्याच्या ओळखीची झालीयत.
तीच झाडं अनेक ठिकाणी भेटल्यामुळं होणारा आनंद सुध्दा आहेच.
सोनचाफा,सोनटक्का अशी नावं घेताना त्याला वेगळीच गंमत वाटत असते.
भिंतीवरच्या चित्रातल्या नारळाच्या झाडावर चढून नारळ काढणं तर खूपच आवडीचं काम आहे
झाडाचं चित्र काढणं तर सुरूच असतं!
केळीच्या पानांनी मोराचा पिसारा तयार केला तर कसा दिसेल?
तसंच एक झाड दिसलं तेंव्हा तरुने विचारलेलं,
"या झाडाचं नाव काय?"
त्याने ते नाव बरोबर लक्षात ठेवलेलं.
तेच झाड एकदा सहलीला गेल्यावर दिसलं तेंव्हा तो म्हणालाच,
"बनाना पाम!"
Monday, September 26, 2011
‘तेंव्हा मी कुठे होतो?’
जुने अल्बम बघणं
हा एक तरुच्या अगदी आवडीचा विरंगुळा आहे.
खरं तर आपल्याला सुध्दा ते आवडतं.
तरुला एकेक फोटो सांगताना
आपण पुन्हा ते गेलेले क्षण आठवत राहतो.
आणि
‘आई,बाबा,आजी ,आजोबा ..पूर्वी असे दिसायचे?’
याचं आश्चर्य
तरुच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत असतं.
आता हे असे फोटो बघताना
त्याला एकच प्रश्न खूप सतावत असतो.
आणि तो नेहमी
विचारतोच,
"तेंव्हा मी कुठे होतो?"
या प्रश्नाचं उत्तर सोपं असलं तरी
ते त्याला सांगणं किती अवघड आहे!
Tuesday, September 20, 2011
"..मग तुम्ही मला ‘रू’ म्हणा"
तरुशी किती बोलू असं वाटत रहातं.
त्याचा आवाज,त्याचा भाव,
त्याचं डोळ्यात बघणं, त्याचं प्रसन्न हसणं..
त्याच्याशी बोलताना गमती होतात
त्या तर मनात अलगद जपून ठेवाव्या!
तो मला ‘पप्पा आजोबा’ अशी हाक मारतो.
खरंतर अनेकांना त्यानं अशीच जोडनावं दिली आहेत.
बोलण्याची घाई झाली की मग या लांबलचक हाका मारताना
त्याला थोडं अवघड वाटणारच.
म्हणून मी त्याला म्हटलं,
"तरू, तू मला ‘पप्पा आजोबा’ नको
फक्त ‘आजोबा’ म्हण."
एका क्षणाचा ही वेळ न घेता
तो पटकन म्हणाला,
"मग तुम्ही मला ‘रू’ म्हणा!"
आश्चर्य वाटतं, त्याला हे सुचतं कसं?
Subscribe to:
Posts (Atom)




