Wednesday, February 29, 2012

ही तर घसरगुंडीच आहे!


तरू त्या दिवशी वानरांना बघून आनंदात होता.
आमची गाडी गगन बावडा घाटातून
हळुहळू खाली उतरत होती.
वळणा वळणांचा तो उतार
आपल्याला घाबरवूनच सोडतो.
तरू मात्र मजेत बाहेर बघत होता.
खिडकीतून दिसणारा तो घाट बघून
तो म्हणाला होता,
"ही तर मोठ्या माणसांची घसरगुंडीच आहे!"

Sunday, February 26, 2012

आपल्याला शेपटी आल्यावर मग..

खूप पूर्वीची म्हणजे तरी असेल एक वर्षापूर्वीची ही आठवण. तरूने वानरांची मजा पहिल्यांदाच पाहिली होती त्या दिवशी. आपण इतक्यांदा बघून सुध्दा कंटाळत नाही त्यांच्या त्या झाडावरच्या अफलातून उड्या बघताना. तरू तर काय बघतच राहिला त्यांना! त्याला खूपच आश्चर्य वाटलं वानरांची ती चपळाई बघून. झाडावरून घरावर.घरावरून रस्त्यावर . केवढ्या त्या उड्या! त्या दिवशी संध्याकाळी, एका शांत क्षणी तरू मला म्हणालेला, "आजोबा,आपल्याला शेपटी आल्यावर मग आपल्याला पण झाडावर उड्या मारायला येतील." मला मोठीच गंमत वाटलेली हे ऐकून. मी खूप हसूही शकलो नाही. त्याला काय वाटेल या विचारानं. आपल्याला शेपटी कधी येईल कुणास ठाऊक? तरू तशी वाट बघत असेल का? त्याला लवकरच सांगायला हवं,तसं काही होणार नाही म्हणून!