Monday, June 25, 2012

चित्र आणि वास्तवाचा संगम!



तरुच्या चित्रांविषयी मला पुन्हा पुन्हा सतत काहीतरी
सांगावंच लागणार आहे.
तो इतक्या गमती करतो चित्रात की आश्चर्य वाटतं नेहमी.
त्याने खेळण्यातल्या ट्रेनला उभं रहायला रूळ काढलेच,
पण त्याच्या बाजुलाच एक चौकोन .. म्हणजे रेल्वे स्टेशन
काढलं आणि तिथं एक मोठा माणूस आणि एक लहान मुलगा काढला.
आणि म्हणाला "तरू आणि बाबा वाट बघतायत ट्रेनची!"
त्याची ती चित्र आणि वास्तवाची किंवा शिल्पाची सरमिसळ (fusion!)
बघून मला पण दोन कल्पना सुचल्या!
गवत खाणारी गाय आणि मोळी घेवून येणारी स्त्री!
अशी नवी वाट दाखवतो त्यावेळी त्याच्याकडूनच खूप शिकायला मिळतं!!

सूर्य‘मामा’ आणि नमस्कार!


तरुला नवीन काही शिकायला खूप खूप आवडतं.
‘खूप’ आणखी काही वेळा लिहायला हवं खरंतर!
या मे मध्ये तरुने किती नव्या गोष्टी शिकल्या
याची एक मोठी यादीच करायला हवी.
त्यात जो भेटेल त्याला ‘गुरु’करून
त्याचा शिष्य व्हायला तरू एका पायावर तयार!
अरुण मामाकडून व्यायाम शिकला त्या दिवशी गच्चीवर.
महत्त्वाचं म्हणजे रुपाली तिथंच होती हजर.
हजर नाही फक्त तर सोबत घेवून कॅमेर्‍याची नजर.
अरुण मामाची आणि तरुची सकाळ सुर्योदयापूर्वीच व्हायची रोज.
आणि मग रोज गच्चीवर सुरू असायचा व्यायामाचा तास!
तरूने केलेले ताडासन,वृक्षासन,आणि सूर्यनमस्कार
बघून आमची मात्र करमणूक झाली.

Monday, June 18, 2012

वळणावरची बस



तरू: हं,आता एक आयत काढायचा.
(तरुला आयत,चौरस,वर्तुळ,शंकू,या संकल्पना किती लहान असल्यापासून कळ्ल्या आहेत!
मला तरी वाटतं दोन वर्षाचा वगैरे असताना मला हे नव्हतं माहित.
अजूनही लोक म्हणतातच ना,‘लहान मुलांना कुठे कळतं?’
पण मला वाटतं सांगेल ते सगळं कळतंच त्यांना.
आपण सांगायला आळस करतो.
आणि सगळं शिक्षकांनीच शिकवावं अशी वेडी
अपेक्षा ठेवतो.)
मी: हं,काढला.
तरू:आता खिडक्या..ड्रायव्हरची खिडकी मोठी काढायची.
दरवाजा कधी मागे असतो,कधी पुढे पण असतो.
आता चाकं काढा. आणि हाsss रस्ता!
(रस्त्याची रेष थोडी खूपच वाकडी येते.माझ्या हे लक्षात आल्याच बघून तो हसतो.
आणि म्हणतो..)
बस वळणावरनं चाललीय.
मी: अरे खरंच की!!

Sunday, June 17, 2012

चित्रकलेचा शिक्षक


"पप्पाआजोबा,मी तुम्हाला विमान काढायला शिकवू?"
तरुला शिकवायला खूप आवडतं.
(कधी कधी माझ्याकडूनच शिकलेली गोष्ट
तो मला शिकवतो ही वेगळी गंमत आहे!)
पण त्याच्याकडून शिकायला खूपच मजा येते.कारण तो खूप मनापासून आणि
छान शिकवतो.
तो अतिशय गंभीर होत म्हणतो,"सोप्पंच आहे.तो खडू घ्या आधी हातात."
लगेचच खडू हातात घ्यावाच लागतो.
"आधी हे असं काढा."
त्याचा हात सहजपणे एक लंबगोल काढतो. मी ही काढतो.
तो ते बघतो. मग माझ्याकडे बघून हसतो.
म्हणतो,"आता असे पंख काढायचे."
माझ्याकडे त्याचं सतत लक्ष असतं.
"इकडे पण एक पंख काढा.असंच मागे पण काढा.
आता खिडक्या काढा. असे ढग काढा."
मी बरोबर त्याच्यासारखं काढतो.
"कसं उडतंय ना विमान!"
त्याचं हसण बघत रहावं नुसतं!
"आता तुम्हाला बस शिकवतो हांsss "
दुसरं चित्र सुरू होतं..

Saturday, June 16, 2012

विमान!


या मे च्या सुट्टीत तरू कोकणात आला तो विमानाने.
महिनाभर आधीच तिकिट काढलेलं.आपण विमानाने जाणार हे कळल्यापासूनच तरूला आभाळ
ठेंगणं झालेलं!
रोज विमानाच्याच गप्पा.किती उंच जाणार?तिथं कसे बसणार?तिथनं काय काय दिसणार?
विमान केवढं असतं? वगैरे वगैरे..
विमानात बसण्याचा दिवस लवकरच सुरू झाला.रात्री रोजच्याप्रमाणे स्वप्नात विमानात बसून झालंच असणार.
पण खरोखर विमानात बसल्यावरचा अनुभव घेताना तरूने शूर वीराप्रमाणे धाडस दाखवलं.आई आणि बाबांनी त्याला आधीच खूप गोष्टी सांगितल्या होत्या.अगदी चाळीस मिनिटातच गोवा गाठला विमानानं.आणि मधल्या वेळात आईने किती काय काय दाखवलं खिडकीतनं!
डोंगर, नद्या,गावं..कृष्णा नदी तर केवढी लांबच लांब पसरलेली.
गोव्याच्यावर आल्यावर तर विमानाने दोन तीन मोठी मोठी वर्तुळं काढली.त्यामुळं समुद्र छानच दिसला.
विमानात काय काय खायला मिळालं.आणि खिडकीतनं विमानचे पंख सुध्दा दिसत होते.
तरुला हा विमानप्रवास फारच आवडला.
गोव्याला पोहचल्यावर आजी आजोबांना भेटून हे सगळं सांगेपर्यंत झोपेची वेळ झालेली.
पण झोपेतून उठल्यावर समोर दिसले ते. तरुचं प्रवासवर्णन सुरूच झालं मग.नंतर किती तरी दिवस "किती मज्जा आली ना विमानात!"असं बाबासोबत बोलताना तो म्हणायचा.बाबाने तर जगातल्या सगळ्या प्रकारच्या विमानांचं एक पुस्तकच आणलं होतं त्याच्यासाठी.
त्यातल्या प्रत्येक विमानावर तरू बोलू शकतो आता.जेट,बोईंग,लढाऊ..
कमला नेहरू पार्क मधलं विमान तो नेहमीच बघत असे.पण आता तो विमानात बसून फिरून आलाय.

Tuesday, June 12, 2012

दे मला गे, चंद्रिके, प्रीती तुझी..


मे महिन्यात तरू इकडे कोकणात आलेला.
पुण्याचं आणि कोकणाचं
कथा कादंबर्‍यांमधलं प्रेम वाचतोच आपण खूपदा.
माधुरी पुरंदर्‍यांच्या एका पुस्तकातला ‘यश’ नावाचा लहान मुलगा
असाच मे मध्ये मामाच्या गावाला जावून समुद्र,आंबे फणस..अशी खास
कोकणातली मजा करतो.तरू कितीतरी वेळा यशची गोष्ट ऐकत असतो ही.
आपली ही गंमत यशसारखीच आहे हे त्याला कळलंय.

पण ऑफिस असल्याने बाबा तरुसोबत सतत राहू न शकल्याने एक घोटाळा झाला होता.
तरुला या आनंदात बाबाची कित्ती आठवण येत होती हे त्यालाच ठाऊक!
बाबा तिथं बागेत घेवून जायचा,किती खेळत असायचा त्याच्या बरोबर!
केवढ्या नव्या नव्या गमती सांगायचा..गाड्यांच्या,विमानाच्या..
‘बाबाला खूप खूप माहित आहे सगळं!’असं एकदा तरू म्हणालासुध्दा बोलता बोलता..
संध्याकाळीतर रडवेला होत"मला आत्ता बाबा हवाय"असं त्याचं सुरू झालेलं.
काय काय करून विसर पाडावा लागायचा.मला मी दादांसाठी किती व्याकुळ व्हायचो
ते आठवलं.सगळ्यांचंच होत असणार ते!

मन रमत नाही.कुणी किती समजावलं तरी ते पटत नाही.
रुपाली तर खिशातून हात काढून ,
"हा घे बाबा. माझ्या खिशात होता ,आता तुझ्या खिशात ठेव."असं म्हणायची.
थोडा वेळ हसायचा तो ही.खिशावर हात ठेवून.
पण मग पुन्हा सुरू व्हायचा,"बाबा हवा"

तरी सुट्टीत राहुल येतच होता सारखा.त्याला तरी कुठे करमत असणार?
बाबा आला की त्याला चिकटायचाच दिवसभर मग.
दोघांच्याच गोष्टी ऐकत रहायचो आम्ही!
फिरायला गेलो तरी हा आपला बाबाच्याच कडेवर.
त्याच्या केसांतून हात फिरवत राहणार.
त्याचे लाड करणार.
तो नसताना केलेल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगत राहणार.
तरू आणि बाबाची कितीतरी चित्रं मला मग शांतपणे काढता यायची.
लांब राहून.

त्या दिवशी रात्रीची जेवणं झाल्यावर पेंगुळलेल्या तरुला घेऊन राहुल उभा होता.
अंधार झालाच होता. वारा छान येत होता.
पश्‍चिमेला चवथीची चंद्रकोर मावळायला आलेली.
डोंगरावर विसावली होती जणू.
तरू बाबाच्या खांद्यावर डोकं ठेऊन तिकडेच बघत होता.
सहज.झोपला नव्हता.पण बडबड थांबली होती.
मी म्हटलं,
"तरुली,चंद्र बघितलास का?बघ किती लाल लाल दिसतोय ना?"
तरू बघतच होता.नंतर तो जे बोलला ते ऐकून आम्ही सगळेच अवाक झालो.
तो असं बोलू शकतो हे माहित झालंय आता..तरीही खूप सुंदरच बोलला तो
तेंव्हा.
तो म्हणाला,
"चंद्र झोपतोय ,डोंगराच्या खांद्यावर!"
Great!
त्याला हे सुचतं कसं?

               

Monday, June 11, 2012

आईसक्रीमला घाम!


अमुक एक गोष्ट अशीच का होते?
असं का असतं?
अशा प्रकारचे प्रश्‍न तरू विचारू लागला की
उत्तरं जुळवताना खूपच गमती होतात.
कधी कधी तरू त्यातनं अर्थ काढतो तो गमतीचा असतो.

 त्या दिवशी दुपारी आईसक्रीमचं दुकान शोधून काढून
आम्ही मजेत त्या थंडाव्याचा आनंद लुटत होतो.
तरू अगदी सावकाश खात होता.
तेंव्हा रूपाली त्याला म्हणाली,
"लवकर खा. नाही तर वितळून जाईल."
"ते बघ वितळतंय." आणखी कुणी म्हणालं.
"आई, आईसक्रीम का वितळतं?"
त्याला काय सांगावं या विचारात काही क्षण गेले.
"थंड असतं तेंव्हा ते घट्ट असतं..पण गरम झालं की ते वितळतं!"

मला वाटतं या उत्तरावर त्याने थोडाच वेळ विचार केला
आणि लगेचच त्याने विचारलं,
"आईसक्रीमला घाम येतो का?"
‘गरम होतंय,केवढा घाम येतोय’ असं तर तो रोजच ऐकत होता ना!

Saturday, June 9, 2012

तुषार मृगाचे.. वाढदिवसाचे..!


आले तुषार मृगाचे
थेंब थेंब आनंदाचे
मेघ धावे, मेघ नाचे
दिस श्यामल छायेचे

आज शांतले मानस
ओल अंतरात दाटे
रोम रोम शहारून
गात रहावेसे वाटे

दिसे पालवीची खूण
सण पावसाळी आज
‘तरू’ नटून,सजून
आहा ! नऊ जून..नऊ जून!!