Sunday, March 18, 2012

तस्सच आहे ना!


अगदी लहान असल्यापासून
तरू सारख्या दिसणार्‍या
गोष्टी शोधून
‘हे तस्सच आहे ना?’
असं म्हणत आला आहे.
त्रिकोण, वर्तुळ,आयत,चौरस,पंचकोन
या आकारांशी त्याने लगेचच गट्टी केली.
झाड,मासे,सूर्य,चंद्र यांची चित्रं तो काढतोच.
एकदा रस्त्यावर पडलेली तार बघून तो म्हणालेला,
"ती मासाच वाटतेय ना?"
आणि खरंच होतं ते!

सांगण्यासारखी गंमत अशी-
तृप्ती मावशीच्या कुरळ्या केसांकडे बघून
तो म्हणाला,
"तुपामाऊचे केस समुद्रासारखे आहेत ना?"
त्याच वेळी त्याचं लक्ष
पूर्वा मावशीच्या सरळ खाली आलेल्या केसांकडे होतं.
आणि म्हणतो कसा,
"पूर्वा मावशीचे केस म्हणजे धबधबाच आहे!"
हे फारच सुंदर निरिक्षण होतं त्याचं.
"आणि तुझे केस रे?"
असं विचारल्यावर म्हणाला,
"माझे तळ्यासारखे आहेत!"
केसांची तुलना पाण्याशी!
आणि
ती ही तंतोतंत!!