Monday, February 28, 2011

‘भारतमाता की जय!’





यंदा प्रजासत्ताकदिनाच्या दिवसात
आमच्या नाटकाच्या तालमी सुरू होत्या.
तरू पहिल्यांदाच
नाटक इतक्या जवळून बघत होता.
खूप मजा येत होती.
कधी कधी नाटकातले संवाद
त्याच्या डोक्यावरनं जात होते.
आणि तेंव्हा
तो सहज विचारायचा,"हा दादा काय म्हणतोय?"
आम्हाला गंमतच वाटत होती त्याच्या बोलण्याची!
नाटकात असलेल्या पंचवीसेक मुलांनी
त्या रात्री झेंडावंदनाची तालीम केली.
सराव केला.

(तरूने स्वातंत्र्यदिनाचं झेंडावंदन पाहिलंच होतं.
ते त्याला आठवलं असणार.
तेंव्हा तो नुकताच बोलू लागला होता.
त्याने त्यादिवशी पहिलं वाक्य तयार केलेलं.
तो म्हणालेला,"झेंडा हलतोय"!)

२६ जानेवारीला सकाळी
आमच्याबरोबर तरू होता
शाळेच्या त्या भव्य सोहळ्यात!
रांगेत उभी असलेली ती सात-आठशे मुलं ,
तिथली कवायत,झेंडावंदन,राष्ट्रगीत,झेंडागीत,घोषणा..
या सगळ्या गोष्टींच्याकडे तो अचंबित होवून बघत होता.
जत्रेतून आणलेल्या वाघोबाचा पडघम
तो आज प्रत्यक्ष बघत होता.
त्याने नंतर तो जवळ जाऊन वाजवला सुद्धा!
नंतर नाटकातल्या मुला मुलींनी
तरुला जवळ येवून किती किती हसवलं!!
चॉकलेट्स दिली.
आजीने तर घरी जिलेबी बनवलेली.
केवढा गोड दिवस होता तो!!!

...अजूनही आठवण होताच
एका हाताची मूठ आवळून
तरू मोठ्याने घोषणा देत असतो,
‘भारतमाता की जय !’

निरागस


नमस्कार करणं
म्हणजे हात जोडून, ‘नम्र’ होणं
हे तरुला कसं समजलं असावं?
देवळात
देवाला नमस्कार करताना
त्यानं अनेकांना बघितल्यामुळे असेल का ते?
मुलं खरंच किती बारकावे टिपतात ना?
तरू अनेक देवांना ओळखू लागलाय.
गणपती,मारुति,विठ्ठल,कृष्ण,...
आणि कुणाची काय खासियत
हे तो सांगू लागलाय.
म्हणजे...
मोदक,बासरी,डोंगर,गदा,कमरेवरचे हात वगैरे..
आईने शिकवलेली ‘शुभं करोति..’ही प्रार्थना
तो हात जोडून म्हणतोय अलिकडे!

Monday, February 21, 2011

जत्रा म्हणजे मजा मजा..




तरू आलेला शिरगावला गेल्या महिन्‍यात.
गावची जत्रा होती नेमकी त्यावेळी.
मला पण कधी एकदा तो दिवस उगवतोय असं झालेलं.
तिथल्या त्या खास उजेडात
त्याचा उजळलेला चेहेरा बघायचा होता ना!

देवळाजवळ सगळं गाव जमलेलं.
भजन,दिंडी तर होतीच.
मुख्य म्हणजे खेळण्‍याची दुकानं!
आम्ही तासाभरात किती खेळणी बघितली!!
आणि काही घरी आणली.
चार फुगे घेतले.वेगवेगळ्या रंगाचे.
तरुला रंग ओळखायला यायला लागलेत आता!
निळा, पोपटी,लाल आणि पिवळा.
तरुने जत्रेतून काय काय खेळणी आणली..
.हं...बैलगाडी,ट्रॅक्टर,हेलीकॉप्टर,भोवरा,
पडघम वाजवणारा वाघोबा,बॅडमिंटनच्या रॅकेटस,
बासरी,पिपाणी आणि भातुकली!

चावी दिली की ट्रॅक्टर मोठा आवाज करत सरळ जायचा.
दोरी ओढली की हेलीकॉप्टरचा पंखा फिरायचाच
पण तिथं छान लाल उजेड दिसायचा.
वाघोबा तर मिनिटभर तडा तडा वाजवत बसायचा.
नंतर काही दिवस आम्ही सगळेच खेळत होतो मग.

भातुकलीमुळे तरू स्वयंपाक करायला शिकला.
भाजी कापून,शिजवून आम्हाला जेवण वाढायला लागला.
चिमटीने हळूच मीठ टाकायचा.
भांडी घासायचा. धुवायचा.
हवेतल्या हवेत नळ सुरु करायचा.
नाटक भारीच होत होतं.
आम्ही दिवसातनं वीसेक वेळा तरी
जेवत होतो त्या दिवसांत.
पोट भरून.
मन भरून!!

Wednesday, February 16, 2011

स्पर्श...





जे दिसेल त्याला ‘हात लावायचाय..’
अशी मागणी असते हल्ली तरुची.
मांजर,कुत्रा यांना हात लावून झालाय कधीच.
हम्माला मात्र आत्तापर्यंत हात लावणं जमलेलं नव्हतं.
तसा तो थोडा अवघडच प्रकार असतो.
पण त्या दिवशी महाबळेश्वरला ते सहज शक्य झालं.
देवळात हम्मा शांत बसलेली.
शंकराच्या सेवेत तत्पर असली तरी
जणू तरूची वाटच बघत होती ती नंदी.
इतकं सुंदर शिल्प होतं ते!
तरुच्या चेहेर्‍यावर कसला प्रचंड आनंद दिसतोय!

किती वर्षं तिथं एकाजागी बसून लहान थोरांना
अवर्णनीय आनंदाचा प्रसाद वाटतोय हा हम्मा!!

Tuesday, February 15, 2011

श्रोता



‘तरी अवधान एकले देइजे..’
असं तरुला सांगावं लागत नाही.
त्याचं आपल्या बोलण्याकडे
पूर्ण लक्ष असतं.
आणि त्याला कळतंच मग
आपण काय म्हणतोय ते!
एकदा आपलं बोलणं संपलं
की मग त्याचे प्रश्नं सुरू होतात.

आजी काय सांगत होती ते तिला आठवतच नाही.

तरू कॅमेर्‍याने बुजत नाही हे तर कधीपासून माहीत झालंय!

एकला चालो रे!




तरू चालायला लागला त्या गोष्टीला फार दिवस नाही झाले अजून.
पण आता तो इतक्या ऐटीत चालतो की बघत रहावं.
भीती वाटतेच कारण वेगात चालतो.
हात धरलेला तर आवडत नाही.
मला वाटतं लहान मुलांना नाहीच आवडत.
आईच्या ऑफिसात रस्ता इतका छान होता,
तरुला थांबवण अवघड होतं.
सोबत कुणी आहे नाही इकडे त्याचं मुळीच लक्ष नव्हतं.

Monday, February 14, 2011

झाडावर घर!





तरू गेलेला आईच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी.
पहिल्यांदाच.
आजी पण होती बरोबर.
‘मला घरी ठेऊन रोज सकाळी आई इथे येते’
हे त्याला आजच कळत होतं.
छानच वाटलं आईचं ऑफिस!
आई, आजी सगळं फिरून बघत होत्या.
तरू तर ऐटीतच होता.
फुलं,गवत,बाग,झरे,सगळं निरखून बघत होता.
हरखून जात होता.

आजीनं तर तिथं दाखवलं झाडावर घर!
तरू किती तरी वेळ बघत होता.
‘झाडावर घर!’
पण होतं किती लहान!
आणि गवताचं!!
गंमतच होती भारी.
आजी काय काय सांगत होती,
‘इथं राहते चिमणी.तिचं नाव आहे सुगरण ’
आणखी असंच काहीतरी..
म्हणजे,
‘लहान आहे न, म्हणून त्याला ‘घरटं’ म्हणतात वगैरे..
त्या दिवशी घरी आल्या आल्या
तरू बाबाना सांगत होता,
‘ आम्ही आईच्या ऑफिसमध्ये घरटं बघितलं! ’

नंतर एकदा तरू बाबांच्याही ऑफिसमध्ये गेलेला.
पण तिथं गेला रात्रीचा. एकतीस डिसेंबर २०१०च्या रात्री.
खूपच मजा आली.सगळेच हसत होते.
हसतच बोलत होते.
बाबांच्या ऑफिसचं हॉटेलच झालेलं.
तिथली सगळीच माणसं तरूकडे बघून
सारखी हसत होती.
तिथल्या त्या छान छान मामांनी
तरूला आवडणारं सूप दिलेलं.
तरू म्हणतो, ‘बाबांच्या ऑफिसात सूप! ’

Wednesday, February 9, 2011

दाढी टोचते!




मामा एक तर लवकर भेटत नाही.
खूप जवळ जावून लाड केले मग.
पण कसली टोचली दाढी!
सांगायला पाहिजे त्याला.

बाईक



बाबा बाईक म्हणतात म्हणून
तरू त्याच्या नव्या गाडीला ‘बाईक’ म्हणतो.
बाबांप्रमाणे त्याच्याकडेही आता चाव्या आहेत छान छान!
घरात आता इथून तिथे जायला बाईकच लागते.
लवकर पोहचता येतं ना!

टोमॅटोचं शेत!



टोमॅटो म्हणजे खायचंच.
जितक्या लवकर ते हातात मिळेल तेवढं यावं.
असा विचार करणार्‍या तरुने
फार फार तर दहा-बारा टोमॅटो एकत्र बघितली असणार.
ती बघून
आनंदाच्या उड्या मारणार्‍या तरुला
सगळं शेत भरून टोमॅटो बघितल्यावर
कसली धम्माल मजा वाटली असणार.
पुरंदरच्या सहलीला ही गंमत झाली!