Friday, November 19, 2010

रोज सवेरे एक टमाटर ..




माहित नाही का पण
टोमॅटो तरुला खूपच आवडतं.
लाल आकर्षक रंगामुळे
स्वयंपाक-गृहात
पहिलं लक्ष टोमॅटोकडे जातंच.
बाजारातही हिरव्या भाज्यांमध्ये
टोमॅटोच मॉनिटर.

स्वच्छ धुतलेल्या टोमॅटोला
एक छोटसं दार करून दिलं की
आंब्याएवढ्याच आवडीने
तरू टोमॅटो संपवतो.

हल्ली आईबरोबर बाजारात गेल्यावर
पहिली उडी टोमॅटोवरच पडते मग.

आईने तरूची आवड बघून
गॅलरीत लावलं टोमॅटोच झाड!
सांगत राहिली आणि,
"तरुली, हे कसलं झाड माहितै का,
टोमॅटोचं!"
तरू रोज बघत होता
झाड मोठं होताना.
झाड लवकरच मोठं झालं.
त्याला फुलं आली.
आणि टोमॅटोपण आली.
पण ती होती
सगळी हिरवी हिरवी.
तरुला नक्कीच प्रश्‍न पडला असणार,
‘असं कसं,हे कुठं टोमॅटो आहे?’
आईला ठाऊकच होतं ते.
ती सारखी तरुला सांगायची,
"तरुली,मोठी झाली की
टोमॅटो सगळी लाल लाल होणार.
मग ती तरुला खायला मिळणार."

एके दिवशी,
खरंच मिळालं की
झाडावरचं टोमॅटो,
तरुला.

अशा प्रकारच्या किती तरी गमती सांगायच्यायत.
तुम्ही ऐकताय ना?

Wednesday, November 17, 2010

हे चित्र कोणी काढलंय ?


तरुला हात,पाय,डोळे अशी
शरीर-ओळख करून दिल्याला खूप दिवस झाले आता.
अलिकडे जरा पुढची पायरी सुरू आहे.
म्हणजे मूठ,चिमूट,तळहात,तळपाय वगैरे.
कालचीच गोष्ट,
रुपाली तरुला आपला तळहात दाखवत होती.
तरुने तो नीट बघितला आणि
तळ्हातावरच्या रेषा बघून तो हसत महणतो कसा,
"हे चित्र आहे."
मजाच आली मग.
रुपालीने नंतर त्याच्याही हातावर
असंच चित्र कसं आहे हे त्याला दाखवलं.

Monday, November 15, 2010

आकाशात उडायचंय..




तरूचं घर आहे पाचव्या मजल्यावर.
गॅलरीत उभं राहिल्यावर
पक्षी अगदी जवळून उडत जाताना दिसतात.
त्यांना तिथे बघत राहणं
हा तरुसाठी आनंदाचा विरंगुळा आहे.

कितीतरी पक्षी त्याच्या ओळखीचे आहेत.
बाजुलाच पाण्याचा एक प्रवाह असल्याने
बगळे,पान-कोंबड्या,बदकं,
कावळे,खंड्या हे दिसत राहतात.
घराच्या जवळ कबुतरं,पोपट
यांचे थवे सारखे फिरत असतात.
वट-वाघळं उंचावरनं, हजारोंच्या संख्येनं,
शिस्तीत कुठंतरी जात असतात संध्याकाळी.
आकाशात त्यांचा एक रस्ताच तयार होतो त्यावेळेपुरता.
आणि घारींच्या वर्तुळांवर नजर फिरवता फिरवता
मानेचा आपोआपच व्यायाम होतो.
ओढ्यापलिकडच्या कुरणात चरणार्‍या
गुरांचं निरिक्षण सुरु असतंच.

आतापर्यंत तरू हे सगळं बघत होता.
कधिमधी कबुतराला हाक मारणं वगैरे चालायचं.
आता तो इतकं वेगवेगळं बोलायला लागलाय,
परवा म्हणाला,
"तरुला आकाशात उडायचंय!"
आपण यावर काय बोलणार?

Thursday, November 4, 2010

तरूरारू आणि आनंदाचे झोके





झोके घेताना
फक्त आपणच मागे पुढे होत नसतो
तर
मनात विचारांचाही हिंदोळा सुरू असतो.

तरूच्यासोबत झोपाळ्यावर बसण्याची मजा
शब्दात कशी व्यक्त करावी?

किती गमती असतात
करण्यासारख्या,
नाही?
पण आपण
उगीचच दुर्मुखलेले होत असतो.
मुलांच्याबरोबर पुन्हा पुन्हा
लक्षात येत राहतात,
लहान लहान आनंदाचे
मोठे मोठे झोके!

‘माझी पण गाडी!’




तरू रोज बाबांना गाडीवर बसलेलं बघतो.
बागेत गेल्यावर कितीतरी गाड्या
वाटच बघत असतात तरूची!
हो.
आणि त्या असतात वेगळ्याच.
बदक,घोडा,वगैरे..

आवाज जरा स्वत:ला करावा लागतो.

श्रीमंती




`छ्न्न, खळ खळ, छन्न
ढुम पट ,ढुम
लेझीम चाले जोरात ..'

तरुने पहिल्यांदाच बघितला
लेझीमाचा खेळ
त्या दिवशी.
स्वारी जाम खूष झाली.
तेही खेळणारे सगळे मावळ्याच्या वेषात.
आणखीच मजा वाटली असणार.

असे खेळ, असे क्षण
किती महत्त्वाचे असतात नाही?
आयुष्याला श्रीमंती येते त्यांमुळे!

जत्रा,उत्सव,बाजार,प्रदर्शनं..
सहली,देवळं,भजन,कीर्तन..
आणि हो,एक राहिलंच की,
..शाळा,सगळी पर्वणीच असते
मुलांसाठी.

They make the life more interesting.

आईचे केस मोठे मोठे



तरू ‘बाबा’ म्हणायला शिकला आणि
नंतर खूप दिवस झाले तरी
‘आई’ मात्र म्हणेना.
रुपालीला कधी एकदा
त्याच्या तोंडून ‘आssई’ हाक ऐकतेय
असं झालेलं.
आई म्हणायला लागला
आणि तरू खूपच गोष्टी बोलायला लागला.
अगदी नकळत तो वाक्य बनवू लागला.
गाणी म्हणू लागला.
एके दिवशी गात होता,
"आईचे केस मोठे मोठे!"

त्याला बरंच कळत होतं की!