Thursday, December 9, 2010

ती शीळ ओळखीची...


तरू अगदी पहिल्यांदा मला भेटला,
त्यावेळी मी शीळ वाजवून त्याचं मनोरंजन केलं होतं ,
हे मला चांगलंच आठवतंय.
तो त्याचा जन्मदिवस होता.
त्यानेही ओठांचा छान चंबू करून
माझ्या बरोबर शीळ वाजवण्याचा
प्रयत्‍न केला होता.
आतासुध्दा फोन करताच मी शीळ वाजवतो
आणि तरू ओळखतो,
‘आजोबांचा फोन आहे’
त्याची शीळ मला ऐकू येते.
चांगले तीन चार प्रयत्‍न ऐकू येतात.
आता समजतंच की, तरू शीळ वाजवतोय म्हणून.
आणि मग ती मंजूळ आवाजातली हाक ऐकू येते,
आणि मनात पुन्हा पुन्हा वाजत राहते,
"हेलो आज्योबाssss,!!"

तरुला शाळेत जायचंय..





तरू आज दिड वर्षाचा झाला.
गेल्या दोन महिन्यात
तो एवढं काय काय बोलतोय,
खूपच मजा येतेय त्याला ऐकताना.
एक म्हणजे
त्याला किती कळतंय ते समजतंय त्यामुळं.
आणि दुसरं म्हणजे
त्याच्याशी चक्क गप्पा मारता येवू लागल्यायत.
हल्ली तो स्वत:ला मी म्हणायच्या ऐवजी
तरू म्हणून वाक्य बनवत असतो.
म्हणजे,"तरुला झोपायचंय",
"तरुला शाळेत जायचंय " वगैरे.
सगळी मुलं दप्तर घेवून शाळेत जातात,
दप्तरात पुस्तकं असतात,
हे त्याला चांगलं माहित आहे.
बाहेर गेल्यावर शाळा दिसताच
त्याची मागणी सुरू होते.
त्याला आणि खरोखरच
वाचायचं असतं भरपूर.
कुठल्या पुस्तकात काय काय आहे
हे त्याला माहित आहे!
भिंतीवर काढलेल्या आंब्याच्या झाडाजवळ जावून ,
हातात पुस्तक घेवून बसतो
आणि म्हणतो,
"तरू झाडाखाली पुस्तक वाचतोय."