Friday, November 11, 2011

" चित्रं काढुया ना.."

रंग, ब्रश, पाणी,आणि कोरा कागद यांची वेगाने मांडणी करून कधी एकदा मनातलं चित्र कागदावर उतरवतोय अशा अवस्थेतला तरू बघायलाच हवा! "आजोबा,चित्रं काढुया ना.." तरू नवनवे फटकारे मारत रोज कितीतरी चित्रं निर्माण करतो आहे. ही चित्रं काढताना सोबत त्यांचं वर्णन करणं त्याला अतिशय आवडतं. "हे मी काहीतरी वेगळंच काढतोय" असं म्हणायला तर खूपच आवडतं. तरुने चितारलेला सूर्योदय,तरुचं फूल आणि मासा इथं वानगीदाखल..

Saturday, October 1, 2011

या झाडाचं नाव काय?

कुठलंही झाड पहिल्यांदा बघताना तरू विचारणारच, "या झाडाचं नाव काय?" त्याच्या या सवयीमुळं कितीतरी झाडं त्याच्या ओळखीची झालीयत. तीच झाडं अनेक ठिकाणी भेटल्यामुळं होणारा आनंद सुध्दा आहेच. सोनचाफा,सोनटक्का अशी नावं घेताना त्याला वेगळीच गंमत वाटत असते. भिंतीवरच्या चित्रातल्या नारळाच्या झाडावर चढून नारळ काढणं तर खूपच आवडीचं काम आहे झाडाचं चित्र काढणं तर सुरूच असतं! केळीच्या पानांनी मोराचा पिसारा तयार केला तर कसा दिसेल? तसंच एक झाड दिसलं तेंव्हा तरुने विचारलेलं, "या झाडाचं नाव काय?" त्याने ते नाव बरोबर लक्षात ठेवलेलं. तेच झाड एकदा सहलीला गेल्यावर दिसलं तेंव्हा तो म्हणालाच, "बनाना पाम!"

Monday, September 26, 2011

‘तेंव्हा मी कुठे होतो?’

जुने अल्बम बघणं हा एक तरुच्या अगदी आवडीचा विरंगुळा आहे. खरं तर आपल्याला सुध्दा ते आवडतं. तरुला एकेक फोटो सांगताना आपण पुन्हा ते गेलेले क्षण आठवत राहतो. आणि ‘आई,बाबा,आजी ,आजोबा ..पूर्वी असे दिसायचे?’ याचं आश्चर्य तरुच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसत असतं. आता हे असे फोटो बघताना त्याला एकच प्रश्न खूप सतावत असतो. आणि तो नेहमी विचारतोच, "तेंव्हा मी कुठे होतो?" या प्रश्नाचं उत्तर सोपं असलं तरी ते त्याला सांगणं किती अवघड आहे!

Tuesday, September 20, 2011

"..मग तुम्ही मला ‘रू’ म्हणा"

तरुशी किती बोलू असं वाटत रहातं. त्याचा आवाज,त्याचा भाव, त्याचं डोळ्यात बघणं, त्याचं प्रसन्न हसणं.. त्याच्याशी बोलताना गमती होतात त्या तर मनात अलगद जपून ठेवाव्या! तो मला ‘पप्पा आजोबा’ अशी हाक मारतो. खरंतर अनेकांना त्यानं अशीच जोडनावं दिली आहेत. बोलण्याची घाई झाली की मग या लांबलचक हाका मारताना त्याला थोडं अवघड वाटणारच. म्हणून मी त्याला म्हटलं, "तरू, तू मला ‘पप्पा आजोबा’ नको फक्त ‘आजोबा’ म्हण." एका क्षणाचा ही वेळ न घेता तो पटकन म्हणाला, "मग तुम्ही मला ‘रू’ म्हणा!" आश्चर्य वाटतं, त्याला हे सुचतं कसं?

Thursday, August 18, 2011

....म्हणजे काय?


तरुला एखादा शब्द कळला नाही
तर त्याचा प्रश्न लगेचच
येतो म्हणजे येतोच.
" म्हणजे काय?"

आता आपल्या बोलण्यात
त्याला न कळणारे बरेच शब्द येतातच.
पण त्याचा प्रश्न टाळून
पुढं जाणं जमेलच असं नाही.

गाणं ऐकतानाही तो शब्द समजावून घेतो.
‘नदी असू दे
असू दे सागर’
असं मी म्हटल्यावर प्रश्न आलेला,
"आजोबा,सागर म्हणजे काय?"
"समुद्र"मी सांगितलेलं.

‘आभाळ आमचं,
आमचा दर्या’
एक दुसरं गाणं म्हणताना ,
"आजोबा,दर्या म्हणजे?"
"समुद्र"

सागर आणि दर्या हे समुद्रच असतात
हे त्याला आता माहिताय.

Sunday, August 14, 2011

वजीर कुठे राहतो?



तरुला आता बुध्दीबळातल्या सोंगट्या ओळखीच्या झाल्यायत.
अजून खेळ काही कळत नाही म्हणा, आणि ते थोडं अवघडच .
पण निदान पात्र परिचय तरी झालाय!
महिन्याभरापूर्वीची गंमत सांगतो.
तरू आणि रुपाली काही चित्रं बघत बसलेले.
ताजमहालाचं चित्र बघताना
रुपाली सांगत होती,"तरुली,हा आहे ताजमहाल!"
ती पुढे सांगत राहिली,"महाल म्हणजे मोठं घर..तिथं राजा राहतो"
तरू विचार करत होता.
त्याला अलिकडे एका राजाची ओळख झालीच होती,
बुध्दीबळातल्या राजाची.
तो लगेच म्हणतो कसा,"वजीर कुठे राहतो?"
मग ओळीने बरेच प्रश्‍न आले.
प्रश्‍नांचा भाता भरलेलाच असतो नेहमी.
"घोडा कुठे राहतो?","हत्ती कुठे राहतो?"....

Tuesday, August 9, 2011

‘बुध्दी’



बुध्दी कशी दिसते?
ती कोणत्या रंगाची असते?
ती केवढी असते?
ती कशाशी खातात?
असे प्रश्‍न कोणी विचारू लागलं तर..
काय उत्तर देणार?
तरुने हे प्रश्‍न नाही विचारले.
पण त्याने विचारलेल्या एका प्रश्‍नावरून
मला असे प्रश्‍न विचारावेसे वाटले.

न दिसणार्‍या गोष्टींविषयी
मुलं काय कल्पना करत असतील?
ती गोंधळून जात असतील.
त्यांना कळत नसेल..
न कळणं म्हणजे काय असतं?
अचानक समोर अंधार उभा राहतो का?
क्लिक करावं पण फोटोच न निघावा ,
बटन दाबावं पण ट्युब न पेटावी ..

जूनमध्ये असेल तरुला घेवून आम्ही
एका देवळात सहजच गेलेलो.
बाहेरची झाडं वगैरे बघून झाल्यावर
नेहमीप्रमाणे चपला बाहेर ठेवून
आम्ही आत गेलो.
आम्ही नमस्कार केला म्हणून
तरुनेही नमस्कार केला.
आजी म्हणाली,"देवाला सांग,मला चांगली बुध्दी दे."
एकदा आमच्याकडे बघून मग मुर्तीकडे बघत
तरु म्हणाला की,"मला चांगली बुध्दी दे!"
नंतर तो आजीला म्हणाला,"तु सांग"
मग आजीने डोळे मिटून,हात जोडून
"मला चांगली बुध्दी दे" असं म्हटलं.
तरू कितीतरी वेळ मुर्तीकडे बघत होता.
मग त्याने आजीकडे बघून विचारलंच
"तुला दिली?"
अवघड प्रश्‍न होता.
मालन म्हणजे आजी थोडा वेळ घेत,
स्वत:ला सावरत म्हणाली,"हो"
तरू खरंच गोंधळला.
मी म्हटलं,"अरे,तुला पण दिलीय.
बुध्दी दिसत नाही.
आपल्याला सगळ्यानाच दिलीय."
तो काही बोलला नाही.
पण तो विचार करायचा थांबला नाही.
मग घंटा वाजवून,तिथली रांगोळी बघून
आम्ही देवळाच्या बाहेर आलो.
चपला घालत असताना तरुने प्रश्‍न विचारला?
"आजोबा,बुध्दीने काय करतात?"
जी दिसली नाही,
तिच्याविषयी त्याला बरंच जाणून घ्यायचं होतं!
आणि पुढे मी मग
कितीही समजुतीचं त्याच्याशी बोललो असलो तरी
माझी बुध्दी त्याच्या मनात
बुध्दी या शब्दाचं चित्र साकारण्यात
किती यशस्वी झाली
मला नाही समजत.

Sunday, August 7, 2011

तुझ्यावर ‘क्ष’ आलाय !




रुपालीची पण खरंच कमाल आहे.
तरुबरोबर ती गाण्याच्या भेंड्या खेळते!
म्हणजे तरुच्या माहितीतल्या गाण्यांच्या भेंड्या.
आता दोन वर्षाचा असला तरी
तरु म्हणत असलेल्या गाण्यांची यादी केली
तर आश्चर्य वाटेल एवढी आहे.
त्याला मराठी आणि इंग्रजी मुळाक्षरही ओळखीची आहेत.
काही शब्द तो वाचतोही.
त्याला हे सगळं गमतीचं वाटतं.

खेळताना दोन पक्ष असले तरी
रुपाली दोन्ही पक्षातून गाणार हे तर नक्कीच.
कुणावर काय अक्षर आलं हे पण सारखं
बोललं जात असणार.
हळुहळू तरुला खेळ कळतोय.
अमुक एक गाणं अमुक अक्षरानं सुरू होतंय.
शेवटी अमुक अक्षर आलं वगैरे..

त्या दिवशी भेंड्याच्या खेळात
त्याने आईची गंमतच केली.
तो म्हणाला,"आई,तुझ्यावर क्ष आलाय!"
क्ष वरून सुरू होणारं गाणं आठवायला
किती वेळ लागला ते माहीत नाही.
भेंडी चढली असणार...
तुम्हाला आठवतंय का एखादं गाणं क्ष वरनं?

An artist from paris






Seeing these paintings so loose, so lyrical..
seeing the confident strokes,
one can say that the new star is emerging..
These are few of the paintings by Taru.
He likes to paint with broad brush.
He holds the brush quite away from the tip.
He mixes colours freely.
And the journey of painting starts
and may continue for hours together.
अमूर्तात काम करणारा हा कलाकार
जेंव्हा चित्रं काढायला बसतो तेंव्हा
त्याच्या जवळ बसून बघत रहावं नुसतं!

Wednesday, August 3, 2011

चिकन हे फळ असते की भाजी?





तरुला कसले कसले प्रश्न पडतात!
आणि त्याच्या या प्रश्नांना काय उत्तर द्यावं,
या प्रश्नात आपण पडतो ,
असे दिवस आहेत सद्या!
चिकन-सूप हा तरुच्या आवडीचा पदार्थ.
मग कधी चिकनही खाल्लेलं.
चिकन खाताना कितीही आवडत असलं,
तरी त्याच्याविषयी चर्चा करायला नेहमीच
नाही आवडत ...
खरं मांसाहार करताना,
‘चुकतंय का आपलं?’असा विचार
सतत मनात असतोच.
अर्थात या काळात
हा विचारच करायला वेळ नसतो म्हणा..
पण तरुने त्या दिवशी
आईला विचारलं,
"आई,चिकन फळ असते की भाजी?"
आणि रुपालीला क्षणभर कळेचना
काय उत्तर द्यावं ते.
तो प्रश्न इतका अचानक
आणि इतक्या बेसावध क्षणी विचारलेला त्याने...
खरंच कुणीच नाही देवू शकणार त्याला उत्तर..
दोन वर्षाच्या तरुला तेही?

Tuesday, July 19, 2011

`शब्दकार’


ही गोष्ट खरं तर
आधिच्या गोष्टीच्या आधिची आहे.
म्हणजे ‘होडींग’च्या आधिची!

"आजोबा आजारी लोकांना बरं करतात.
आजोबा डॉक्टर आहेत."
रुपाली सांगत असताना
तरू लक्ष देवून ऐकत होता.
हे तर त्याला कधीचं माहिताय.
"आजोबा नाटक लिहितात
म्हणून
आजोबा नाटककार सुद्धा आहेत."
हा शब्द तरुसाठी नवीन होता.
"कोण?"
रुपाली पक्कं करत होती.
तरुला कळलं होतं.
त्याने बघितलंय की आजोबांचं नाटक!
"नाटककार"... तरु.
"आणि आजोबा चित्रं काढतात
म्हणून आजोबा ‘चित्रकार’पण आहेत."
"चित्रकार" तरुने म्हणून बघितलं.
"तुपामाऊ पण चित्रकार आहे!"
माऊनं तरुची खोली
खूप छान छान चित्रांनी सजवलीय.
तरुला हे माहितच होतं.
होडी,गवत,फुलं,तलाव,फुलपाखरं..किती सुंदर!
मग तरू म्हणाला,
"आई,माऊ होडीकार आहे.
माऊ फुलपाखरूकार आहे."
तरू ‘शब्दकार’ आहे
हे तेंव्हापासूनच लक्षात आलंय.

Monday, July 18, 2011

होडिंग,जहाजिंग...





तरू जूनच्या सुरुवातीला
केरळला फिरायला गेलेला हे मी तुम्हाला सांगितलं का?
पाऊस नुकताच सुरू झालेला.
त्या पहिल्या पावसात केरळचा सुंदर प्रदेश
तरू, राहुल आणि रुपाली
पहिल्यांदाच पहात होते.
खूप छान आठवणी घेवून आले ते.
जंगलातले हत्ती, हरणं..सुद्धा बघायला गेलेले ते.
देवळं,समुद्र,कमळाची तळी,आणि खूप काही...

यात एके दिवशी त्यांनी बोटींग केलं.
(तिथं खांबावर बसलेला खंड्या पक्षी
तरुला आजही तसाच आठवतो.)
आणि नावाडी होता तरू!
आई आणि बाबांच्या पुढे होता तो बसलेला.
काल त्याच गप्पा निघाल्या होत्या.
तरुला कोल्हापुरचा रंकाळा आठवत होता.
तिथं होडी पाहिल्याचं त्याला आठवत होतं.

"आई, आता आपण रंकाळा तलावात
‘होडिंग’ करुया?"
रुपाली त्याच्याकडे बघतच राहिली.
त्याने त्याच्या मनाने
नवाच शब्द तयार केला होता!
‘होडिंग’
रुपालीला हसणं आवरत नव्हतं.
त्याच्या पुढे जात तो म्हणाला,
"आणि समुद्रात जहाजिंग!!!"
आणि तो ही हसायला लागला.
कसं सुचतं त्याला?

Friday, July 8, 2011

झाडांची पण अंघोळ





आजचीच गोष्ट.
संध्याकाळी पाऊस पडत होता.
तरू खिडकीत उभा राहून
पाऊस बघण्यात रमला होता.
आई पण बघत होती.
पावसाला आणि त्याही पेक्षा
पाऊस शांतपणे अनुभवणार्‍या तरुला!

झाडांवर पावसाचं पाणी पडताना बघून
तरू म्हणाला,"आई, झाडं भिजली सगळी."
"हो.झाडं पण अंघोळ करतायत पावसात."
आईने सांगितलं.
नंतर तरू जे बोलला ते फारच सुंदर होतं.
तो म्हणाला,
"आई,आता त्यांना पुसून
क्रीम लावायला पाहिजे."
तरुची अंघोळ झाल्यावर
आईचा तोच कार्यक्रम असतो!

रुपालीला खूप हसायला आलं.
तिने त्याला खूप जवळ घेतलं
आणि त्याच्याकडे बघत
ती पुन्हा पुन्हा हसत राहिली.
तरू मात्र त्या भिजलेल्या झाडांकडेच
एकटक बघत होता.

‘धबाsssक’




तरुला असले शब्द फार आवडतात.
म्हणजे ज्या शब्दांमध्ये जोरदार कृती
जणू चित्रबध्द केलेली असते.
उईंssग,टुईंssग..वगैरे..
असे शब्द त्या त्या वेळी अचानक सुचतात.
ते शब्दकोषात मिळण्याची शक्यता नसते.
गाडी कशी गेली?
तर सुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्कन...!!
कदाचित असे शब्द लिहायला प्रत्येक वेळी जमणारही नाही.
फुलपाखरू कसं उडतं?
तर ‘.......’
काय लिहावं?
तरू या प्रश्‍नाला उत्तर द्यायचं तर
जोराने हात हलवत कसा कसा धावत राहतो.
आणि एका ठिकाणी बसत म्हणतो,
"मी आता फुलावर बसलोय. मी आता मध पिणार.."

‘तळ्यात-मळ्यात’या खेळाच्या निमित्तानं
तरू उडी मारायला शिकला.
आणि मग ‘धबाssक’ हा शब्द आपोआपच
उडीच्या सोबत तोंडात बसला.
`एsss धबाssक’ या शब्दाबरोबर
योगेश मामाची आठवण पण जोडलेली आहे.
त्याबद्द्ल पुन्हा कधी...

Wednesday, July 6, 2011

फ्रॅंकलिनची तरुला केवढी काळजी!



ही गंमत फारच वेगळी आहे.
तरुकडे असलेल्या पुस्तकांमध्ये
एक पुस्तक फ्रॅंकलिन या कार्टून कासवाचं आहे.
आज तरू तेच वाचत
म्हणजे बघत,चाळत होता.
आई बाजुलाच होती बसलेली.
तर तरू अचानक म्हणाला,
"आई, किती वाढली आहेत नखं या फ्रॅंकलिनची!
आई, कापायला पाहिजेत ना?"
आता पुस्तकातल्या चित्रात
तरू किती रमत असेल
याचा अंदाज यावरनं करता येईल खरं तर.

कशी कापावी नखं
त्या पुस्तकातल्या पात्राची?

आमच्या नाटकात कॅलेंडरमधल्या वाघाला भूक लागते
तसाच हा अनुभव होता.
विचारांना मागे टाकून भावनेच्या झोक्यावरचा..
उंच झोका!

Tuesday, July 5, 2011

मी रंगवणार गणपती!





आज तरुला शिरगावची खूपच आठवण येत होती.
तशी ती रोजच येते म्हणा.
"आई आपण कधी जायचं शिरगावला?" आजही त्याने विचारलं.
मी फोनवर ऐकत होतो त्यांचं बोलणं.
रोज त्याला काय उत्तर द्यावं हा प्रश्‍न रुपालीसमोर असत असेल.
"गणपतीला जाऊया "तिने आज सांगितलंच त्याला.
"कधी?"
"दोन महिन्यांनी असणार गणपती."
"कोण करणार गणपती ?"
तरुला माहिताय गणपती करतात ते!
"आजोबा"
"मी रंगवणार गणपती !"
त्याला सगळं दिसत होतं पुढं.
"मी गुलाबी रंग देणार!"

तरुने गणपतीचे दिवस मनात जागे केले.
तरुने गेल्या वर्षी गणपती रंगवतानाच
पहिल्यांदा ब्रश हातात घेतलेला.
आणि मी मूर्ति तयार करताना मलाही
सतत तरू समोर दिसत होता.
त्याने आठवण केली म्हणून मी
समईच्या उजेडात काढलेले फोटो बघत होतो आता.
छानच वाटत होतं ते मंद प्रकाशातलं रूप!

Sunday, July 3, 2011

राजगडला समुद्र आहे का?




लहान असताना,
म्हणजे दीड दोन महिन्याचा असल्यापासूनच
तरूला आम्ही समुद्रावर नेत आलोय.
आमच्या आनंदाचा तो भाग होता.
त्याला कळायला लागलं तेंव्हा मात्र
समुद्राला अगदी सुरुवातीला घाबरलेला तरू.
मला वाटतं कुणीही घाबरणारच.
मी तो अजूनही घाबरतो.

पण पाण्यात खेळायला आवडायला लागलं
आणि प्रत्येक भेटीत तरू
समुद्राच्या जास्तच प्रेमात पडत गेला.
देवगड जवळचा कुणकेश्वर मंदिराजवळ्चा समुद्र
तर तरुचा मित्रच.
तिथं लाटांबरोबर खेळणार्‍या तरुला
घरी घेवून येणं मोठं अवघड काम आहे.
"आपण कुणकेश्वरला जाऊया?" हा प्रश्‍न तर
त्याच्याकडे नेहमी तयारच असतो.
तो पुण्यात असला तरी!

आज सकाळी आई बाबांचं
फिरायला जाण्याविषयी बोलणं चाललेलं.
तरू खेळत होता बाजुलाच.
"राजगडला जायचं का?" बाबा म्हणत होते आईला.
तर तरुने पटकन विचारलं,
"राजगडला समुद्र आहे का?"!!!!

आता काय बोलणार?

Thursday, June 30, 2011

स्मरणचित्रांची गोड सुरुवात





तरुला चित्रं काढताना बघणं
हा एक खूप प्रसन्न असा अनुभव आहे.
कारण तो इतका गंभीर होत चित्रं काढतो,
आपल्याला त्याच्या त्या सुंदर एकाग्र होण्याचं
हसू येवू शकतं.
खूप प्रयत्‍नांनी त्याने
त्याच्या रेषेवर हुकुमत मिळवलीय.
हो असं म्हणता येईल,
कारण किती सहजतेनं
तो वर्तुळं आणि सरळ रेषा काढतो !
एखाद्या झपाटलेल्या चित्रकारासारखा
तो एकामागे एक अशी चित्रं काढतच सुटतो.
दिवसाला चाळीस चित्रं तरी होत असतील त्याची.
मग त्यात झुक झुक गाडी या विषयावरचीच बरीच असतात
ही एक वेगळी गंमत आहे.
त्यासाठी मला खूप लिहावं लागणार आहे .
आज फक्त एकच गोष्ट सांगतो,पहिल्या स्मरणचित्राची.

सव्वीस जानेवारी नंतरचा दिवस असणार तो.
रुपालीने कागदावर झेंड्याचं चित्र काढलेलं.
त्या दिवसात तो एक नवाच आनंद होता.
‘झेंडा उंचा रहे हमारा’हे तर तरू सारखं म्हणत होता.
रुपालीच्या चित्रात त्याने दोन छोटी वर्तुळं
आणि त्यांना जोडून दोन लहानश्या रेषा खाली ओढल्या.
आणि म्हणाला,"ही आजी आणि हे आजोबा"
म्हणजे त्याला शिरगावचं झेंडावंदन आठवत होतं तर.
नंतर त्याने तिथंच बाजुला चकलीसारखं काही काढलं.
आणि म्हणतो कसा,"आणि ही जिलेबी!!"
त्यादिवशी आजीने केलेली जिलेबी
झेंड्याच्या आठवणीला अश्शी चिकटलेली होती!

बालचित्रकलेची हिच तर खासियत आहे ना.
तिथं मनातलं कागदावर उतरायला
अडचण कसली ती येतच नाही.
तरुने मोठी गोड सुरुवात केली ना
स्मरणचित्रांची!
जिलेबी!!!

Wednesday, June 29, 2011

ऑफिस ऑफिस




‘रोज बाबा जातात कुठं तर ऑफिसला.
पूर्वी आई पण जायची. आता नाही जात.
आता दिवसभर माझीच असते ती.
आईने ऑफिसला जायचं बंद केलं
हे तर एकदम भारी झालं!’
तरुला बाबांच्या ऑफिसला जाण्याचा राग येत असणारच.
पण त्याला आता कळलंय,
सगळ्यांना जावंच लागतं ऑफिसला.
आणि त्याला तिथं जावून काम करतात
हे सुध्दा माहित झालंय.

आता त्याच्या रोजच्या खेळात ह्या ‘ऑफिस’च्या खेळाची
भर पडली आहे.
नेमकी त्याला एक पुठ्ठ्याची बॅगही मिळाली आहे.
ती घेवून,बाय करून तो खोट्याच गाडीत बसतो.
‘स्टीअरींग व्हील’ (हा त्याच्या अतिशय आवडीचा शब्द आहे)
फिरवत राहतो.
थोड्या वेळाने ऑफिस येतं.
तिथं कंप्युटरवर बसून कामच काम!
मग डबा खायचा
आणि मग घरी येताना पुन्हा गाडी...

एकदा कधी राहुलने ऑफिसचा डबा घरी आल्यावर खाल्ला
तर दुसर्‍या दिवशी तरुच्या नाटकातही
त्याने घरी आल्यावर डबा खाल्ला!!

मुल मोठ्यांना भिंगातनं बघत असतात.

Monday, June 27, 2011

भातुकलीचा खेळ



शिरगावच्या पावणाईच्या जत्रेतल्या त्या खेळण्यांच्या दुकानातून
रुपालीने तरुसाठी भातुकलीची खेळणी घेतली
त्यावेळी मला माहितच नव्हतं मुळी
की त्यांच्यामुळे इतकी धमाल येणार आहे!

त्या रात्री आम्ही जेवलेले असूनही पुन्हा
किती तरी वेळा जेवलो!!
दोनच मिनिटात तरुचा स्वयंपाक व्हायचा
आणि पुन्हा पुन्हा ताटं वाढली जायची.
तिथं जवळच खोट्या नळाखाली भांडी धुतली जायची.
गॅसवर लगेचच कढई ठेवायचा तरू.
चिमटीनं हळूच मीठ सोडायचा भाजीत.
ही मजा दिवसागणिक वाढतच चाललीय.

आता परवा तर मला आणि मालनला
skype वर जेवू घातलं त्याने.
त्यात जेवणाबरोबर चटणी,लोणचं
या गोष्टीही होत्या.
वाटाणे-भात केलेला.
जेवण बनवताना त्याची commentary सुरू होती.

आता भांडी खूप वाढली आहेत.
लाकडाची, प्लॅस्टिकची,स्टीलची..
वेगवेगळ्या पदार्थांची ही मेजवानी,
ते जेवण्याचं नाटक,आणि मग ढेकर देण्याचंही नाटक..
मजा असते नुसती.
कधी कधी ते मग हॉटेलमधलं ‘किचन’ होतं.
घरात हॉटेल अवतरतं.
मी आता विचार करतो तेंव्हा कळतं,
रुपालीने हे केवढं मोठं आनंदाचं दालन खुलं केलं तरुसाठी!
खरं तर सगळ्यांसाठीच!!

मी बचत गटांतल्या स्त्रियांना
ही गोष्ट नेहमी सांगतोय तेंव्हापासून
"मुलगा म्हणून त्याने चेंडू किंवा गाड्या
किंवा बंदुकीने खेळावं
असं नका समजू.
त्याला लहानपणापासूनच स्वयंपाकाची गोडी लावली
तर किती समजूत येईल पुढच्या पिढीत याचा विचार करा.

एक साधी-सोपी पण वेळेवर केलेली कृती
पुढच्या आनंदाचं आरक्षण ठरणारी असेल!

Sunday, June 26, 2011

सुपारी फुटली..



वस्तुसंग्रहालयातून आणलेलं पुस्तक चाळताना ही गंमत झाली.
एकेका वस्तुचं चित्र बघत बघत, त्या त्या चित्रावर बोलत बोलत
तरु आणि रुपाली यांचा ‘अभ्यास’ चालला होता जणू.
"आई,हे काय आहे?"
"अडकित्ता"
"काय करतात ह्याने?"
"सुपारी फोडतात..कत्रीने कसे कागद कापतो.."
"सुपारी फोडतात? खंडेरायाच्या लग्नाला.."
थोडा वेळ रुपालीच्या लक्षात येईना हा काय म्हणतोय ते.
मग नीटच समजलं तो काय म्हणतोय ते.
सुपारी या शब्दावरनं तो त्या गाण्यात शिरला होता.
‘खंडेरायाच्या लग्नाला,नवरी नटली
नवरी नटली,
अगं बाई सुपारी फुटली.’
कार्तिकी दिदीने म्हटलेलं गाणं त्याच्या लक्षात
होतं तर!
ऐकलेल्या गोष्टी कशा पुन्हा नेमक्या वेळी आठवतात?
प्रत्येक शब्द,सूर,गंध,रुची,स्पर्श,दृश्य यांचं एक गावच वसतं.
सगळे एकमेकांना जोडलेले असतात.वाटा तयार होतात.
नवी घरं तयार होतात.लहानशा वाडीचं शहर होत जातं हळुहळू.
निवांत बसलो असतानाही आपण मनातल्या या ‘स्म्रृतीपुरात’
फिरत असतो. अडकित्त्यातून सुपारीत आणि सुपारीतून लग्नात...

Saturday, June 25, 2011

पिंपळाचं झाड




तरुने केलेले अनेक छोटे विनोद
नंतर आठवत नाहीत.
त्या त्या वेळी सगळ्या गोष्टी
आपोआप कुठंतरी
रेकॉर्ड व्हायला हव्या होत्या ना?

मुंबईला जाण्यासाठी,नांदगाव्च्या रेल्वे स्टेशनवर
मला निरोप द्यायला,
मला वाटतं सहा मे च्या संध्याकाळी
तरू,रुपाली आलेले.राहुलही होता.

त्यादिवशी खरी आगगाडी बघणं
हा एक अतिशय आवडीचा कार्यक्रम झाला.

तिथं एक आवळ्याचं झाड होतं.ते दाखवत मी तरुला म्हटलं,
"तरू, ते बघ आवळ्याचं झाड."
"आलेत का आवळे?"
तरुने पटकन विचारलं.
हे त्याच्याकडून अपेक्षितच नव्हतं.
मी रुपालीकडे आश्चर्याने बघितलं.
तरूपासून बर्‍यापैकी लांब येत
ती मला हळूच सांगत होती,
"पप्पा, हे काहीच नाही.
मी त्याला परवा पिंपळाचं झाड दाखवलं,
तर विचारत होता आलेत काय पिंपळ?"
आम्हाला त्याचा तो निरागस प्रश्‍न
फार हसवून गेला!
बाराही महिने आंबे खायला देणारं झाड
त्याच्या खोलीत असल्यामुळे
सगळ्या झाडांना
त्यांच्या नावांची फळं लटकतच असावी
असं त्याला जर वाटलं
तर ते बरोबरच आहे!

चेहर्‍यावर येणार्‍या तारुण्यपिटिकांना
आपण इंग्रजीत ‘पिंपल्स’ म्हणतो.
अशा तरुण रुग्णांना तर मी आता
‘पिंपळाची झाडं’म्हणू लागलोय.
या विनोदाचे हक्क तरुकडे आहेत
हे मात्र तितकंच खरं आहे.

Friday, June 24, 2011

तरू आणि ‘तार्‍यांचं बेट’


तरू चित्रपटगृहात बसून शांतपणे एखादा चित्रपट पाहू शकतो हे त्या दिवशी आम्हाला पहिल्यांदाच कळलं.
‘तार्‍यांचं बेट’ या चित्रपटाविषयी ऐकलेलं.बघावासा वाटत होता. म्हणून झोपलेल्या तरुला घेवून आम्ही मोठ्‍या धाडसानेच
बघायल गेलो. रुपाली,मी आणि तरू.तिथल्या आवाजाने जाग आलीच त्याला.पण तो रडला नाही.मला वाटतं,"आई,कुठे आलोय आपण?"असं विचारलं त्याने.रुपालीने हळू आवाजात पण छान उत्तर दिलेलं,"सिनेमा बघतोय आपण.मोठ्या पडद्‍यावर गोष्ट बघायची आपण."
गोष्ट म्हटल्‍यावर भीतीच्या जागी उत्सुकता आली.रुपाली त्याला भारीच समजावते नेहमी.शांतपणे कसं बोलायचं असतं हे तरू आईकडनंच शिकतोय.
मग तरुने ती दादा आणि दिदीची गोष्ट लक्ष देवून बघितली. मध्येच रुपालीबरोबर शंकानिरसन चालू असायचं,पण ते हळू आवाजात.गोष्टीत शाळा,सायकल,होडी,भजन,तबला..असं आवडणारं काही काही होतं.त्यामुळे तो रमला होता.मुंबई,हॉटेल,डबलडेकर बस यामध्ये तो चित्रपटातल्या मुलांइतकाच हरवला होता.आई,बाबा,आजी,पोलिस ही सगळी मंडळी त्याच्या लगेचच ओळखीची झाली.एवढ्‍या मोठ्या अंधारात भला मोठा पडदा आणि एवढी माणसं एकत्रं बसून एक ‘गोष्ट ’बघतायत हा तरुसाठी एक नवीनच अनुभव होता. आणि आमच्यासाठी तरुने सिनेमा बघणं हा!
सिनेमा संपल्यावर आम्ही बाहेर आलो. गोष्टीतनं बाहेर पडणं अवघड होतं पण.‘तार्‍यांचं बेट’चं पोस्टर समोरच्या भिंतीवर दिसत होतं.तिथं ती गोष्टीतली दिदी,दादा,आई,बाबा..बघून तरुला जाम मजा वाटली.
काय काय बघितलं तरू? या रुपालीच्या प्रश्‍नाला बरचं मोठं उत्तर दिलेलं त्याने.पण त्यातली गंमतीची गोष्ट सांगायची तर तो म्हणालेला,"आई,आणि त्या मावशीने चूळ भरली!’ होडी चोरीला गेली त्यादिवशी सिनेमातली आई सकाळी तोंड धुण्यासाठी अंगणात येते तर होडी जाग्यावर नाही.ती चूळ भरताना दचकते हे दाखवण्यासाठी दिग्दर्शकाने ते दृश्य फ्रीज केलेलं.तरुच्या ते बरोबर लक्षात राहिलं!
अलिकडेच त्यानंही दात घासायला सुरू केल्यामुळे ‘चूळ भरणे’ म्हणजे काय ते कळलं असावं.नवे शब्‍द किती गोळा होतात त्याच्या झोळीत रोज?

Wednesday, June 22, 2011

पुस्तकांचं दुकान




तरुचं पुस्तकांचं वेड तुम्हाला माहितच आहे.
म्हणजे सहा महिन्यांचा असल्यापासूनच
तो एक चांगला वाचक आहे.
कुठल्या पुस्तकात काय काय आहे हे तो सांगतो.
आपल्याला हवं तेच पुस्तक तो मागतो.
पुस्तकात रमतोही.

आता चांगलं चालता,बोलता येतंय त्याला.
त्यामुळे तरुच्या पुस्तकांमध्ये ज्या गोष्टी आहेत
त्या तो सांगू लागलाय.
तेनालीरामनची गोष्ट साभिनय सांगायची असते त्याला!
मग घरातल्या प्रत्येकाला त्यात रोल मिळतोच मिळतो!

एप्रिल महिन्यात
मी तरुबरोबर पुण्यातल्या ‘क्रॉस वर्ड’ या दुकानात गेलो होतो.
पुस्तकांचं अस्तित्त्व,तिथला नेटकेपणा,आणि पुस्तकवेडी माणसं
यामुळं हे अगदी आनंदाचे क्षण असतात.
तरू एकेका कपाटापुढून पुढे जात होता.
आश्चर्य असंकी तो सुध्दा
मध्येच एखादं पुस्तक उघडून चाळत होता.
मी त्याच्याकडेच लक्ष ठेवून होतो.
एखादं पुस्तक त्याच्याकडून पडायचं वगैरे..
पण तो पुस्तकं सावकाशच घेत होता.
चित्रं बघून हरकून जात होता.
एक मोठं पुस्तक चाळलं त्याने.
त्यात एकही चित्र नव्हतं.
माझ्याजवळ येत तो म्हणाला होता,
"आजोबा,या पुस्तकात काहीच नाही!"
मग मात्र त्याला मी ,
"लहान मुलांची पुस्तकं इकडे आहेत अरे" असं म्हणालो होतो.
पण ज्या कुतुहलानं तो सगळं बघत होता,
मला तिथंच मिठीत घ्यावंसं वाटत होतं त्याला.
थोड्या वेळानं रुपाली तिथं आली
आणि तिला सुध्दा ते बघून छानच वाटलं असणार.
एव्हाना इतर लोकांचंही लक्ष त्यानं खेचून घेतलं होतं.
मोठ्या दुकानातला छोटा वाचक!

Saturday, June 18, 2011

सिध्दगिरीचा डोंगर






गेल्या डिसेंबरमध्ये
तरू पहिल्यांदाच नाटकाची तालीम बघत होता.
रोज मुलं येतात.गच्चीवर जातात.
खेळतात.उड्या मारतात.
आणि मग ‘नाटक’ करतात.
आजोबा त्यांना काहीतरी मध्ये थांबवून सांगतात वगैरे..
रोज रोज त्याच गोष्टी घडायच्या.
मुलं(तरुच्या भाषेत दादा,दिद्या..)काय बोलतात
ते आता
त्याला कळलही होतं.

शाळा भरते. ‘सिध्दगिरीच्या डोंगरावर वनभोजन जाणार’ असं शिक्षकांनी सांगताच मुलं‘हेsss’करून ओरडतात.
मुलं वनभोजनाला निघालेली असताना त्यांचा रस्ता अडवला जातो.डोंगरावर खाण होणार त्यामुळे सगळ्या डोंगराला कुंपण घालणार्‍या खाणवाल्यांचा मुलांना खूप खूप राग येतो.

तरुला नाटक छानच कळलेलं!

नुकताच चालू लागलेला तरू नाटकातलं पात्र बनून
त्याच्या नकळतच रंगमंचावर फिरत होता.
गाणी गात होता.
वेळेवर संवादही म्हणत होता.
त्याला तसं करताना बघून
मुलांना,आम्हाला खूप हसायला येत होतं.

त्यानंतर अंथरुणावर ऊशी ठेवून
तो तिला ‘सिध्दगिरीचा डोंगर’ म्हणायचा.
आणि एकटाच सगळं नाटक करायचा.

आश्चर्याची गोष्ट अशी की सहा महिन्यांनी
तरू पुन्हा आजोळी आला तेंव्हा
जिथं नाटकाची तालीम व्हायची तिथं तो पहिल्यांदा पोहचला.
तिथंच कुठंतरी पडलेली छोटीशी काठी त्याने उचलून हातात घेतली आणि
तो झाला नाटकातला मुलांना अडविणारा वॉचमन.
तरू कधीच नाटकात शिरलेला.
आम्ही बघतच राहिलो.
त्याला सगळे संवाद आठवत होते.
"ए पोरांनु, कुठं चालला तुम्ही?"
"डोंगरावर"
"कशाला?"
"वनभोजनाला"
"जायला मिळणार नाही."
"का पण?"
"काम चालू हाय. रस्ता बंद हाय"
दिवसभरात कितीतरी प्रयोग बघण्याचे
आणि त्या निमित्ताने नाट्यानुभवात रमण्याचे
क्षण
तरू आम्हाला देत होता त्यानंतर महिनाभर!!

Friday, June 17, 2011

निरुत्तर!



दिवसभर कसले कसले खेळ खेळत ,
गप्पा करत राहणारा तरू
इतका त्यात मग्न असतो
की मग खाणं, पाणी पिणं
या गोष्टींसाठी त्याच्याकडे वेळ नसतो.
तहान भूक हरवून जाणं म्हणजे काय
हे तर त्याच्या ह्या वागण्याकडे बघून
कळणारच.

मे महिन्यात खेळण्याच्या नादात पाणी न पिणार्‍या तरुला
रुपाली समजावून सांगायची,"पाणी पिल्यावर छानच वाटणार तुला.
उन्हाळ्यात खूप पाणी प्यायचं असतं अरे.." वगैरे,वगैरे.

परवा ती असंच पाणी प्यायचा आग्रह करीत होती.
तरू जे बोलला ते ऐकून मला त्याच्या वयाचा प्रश्नच पडला.
रुपाली म्हणाली सुध्दा, "पप्पा, हा असं काही बोलतो ना,
लोकांना तो खूप मोठा असावासा वाटतो."
तर.. तरू म्हणाला,
"पण आई आता उन्हाळा नाही आहे ,
आता तर पावसाळा आहे ना!"

निरुत्तर ना ?

Thursday, June 16, 2011

पावसाचं गाणं



एवढ्‍याशा तरुला एवढी गाणी येतात,नवल वाटतं.
शिवाय त्या गाण्यांचा अर्थही त्याला माहित असतो!
नाही कळलं तर विचारायचं हे त्याला छानच कळलंय.
त्या दिवशी पहिल्या पावसाचा निरोप घेवून वारा येत होता.
उन्हाच्या अनुभवानंतर तो गार वारा ..आणि पावसाचे थेंब !
भारीच वाटत होतं.
आजी तरुसोबत अंगणात बसलेली.
आश्चर्य असं की तरू गात होता..
पाऊस आला‘वारा आला,
पान लागले नाचू
थेंब टपोरे..
गोरे गोरे
भर भर गारा वेचू!

तरू आणि ऋतू


ऊन लागतं तो उन्हाळा,थंडी लागते तो हिवाळा आणि
पाऊस पडतो तो पावसाळा
हे माहित झालंय तरुला आता!
गंमत म्हणजे आईचा वाढदिवस उन्हाळ्यात,बाबांचा हिवाळ्यात
आणि तरुचा पावसाळ्यात हे सुध्दा त्याला कळलंय!!
दोन वर्षांचा तरू
पण त्याला सगळ्यांचे वाढदिवस
तारखेसह माहित आहेत हे बघून
मला खूपच मजा वटली.

Tuesday, June 14, 2011

तरुचा वाढदिवस..मृगाचा पाऊस!




या नऊ जूनला तरू दोन वर्षाचा झाला.
तरुच्या जन्‍मादिवशीचं आभाळ असंच सावळ्या मेघांनी भरलेलं होतं.
आणि आम्ही सगळे तरुच्या दर्शनाने भारलेले होतो!
तरुला मांडीवर घेऊन
वार्‍यावर झेपावणार्‍या ढगांकडे बघताना
आम्हाला अनेक बाष्प-शिल्पं दिसत होती.
मातीचा सुगंध हवेत हलकेच हेलकावत होता.
माझ्या जवळ नेहमीप्रमाणे कोर्‍या पानांची वही वाट बघत होती..
नव्या चित्राची.

प्रत्येक ‘मृगाचा पाऊस’ असेल तरुचा वाढदिवस.
प्रेमाचा मृद्‍गंध आणि सुखाची आरास!!

Wednesday, April 6, 2011

आईचा वाढदिवस, मजाच मजाsssss !!!





आई आणि तरुलीची रोजच मजा असते हल्ली.
आताशा आई पहिल्यासारखी ऑफिसला जात नाही
ही तर केवढी गंमत!!
त्यामुळं सारखं आईशी बोलता येतं.
अगदी वाटेल तेंव्हा.
"आई" असं तरू दिवसभरात किती वेळा म्हणत असेल..
खरंच मोजायलाच हवं एकदा.

खेळायचं,खायचं,फिरायला जायचं,
पुस्तकं वाचायची,पाखरं बघायची,गाणी ऐकायची,
तबला,पेटी,सायलोफोन,बासरी वाजवायची,
भाजी निवडायची,कचरा काढायचा..
आणि हो रोज चांदोमामा बघायचा म्हणजे बघायचाच!
बाबांबरोबर अंघोळ करायची,
फुटबॉल,क्रिकेट,मेकॅनो खेळायचा,बाइक चालवायची..
आणि यात मध्ये मध्ये छान झोपायचं,असं सुरू असतं.

आज तर काय भरपूर केक खायचाय..
फिरायला तर जाणारच..
आई जवळ घेणार आणि ..
तरू आईला हळूच ‘पा’ देणार आणि
गाणं म्हणणार,
"ये पाऊस मोठा आला !"

खूप आनंदात तरू हेच गाणं म्हणत नाचू लागतो!

Thursday, March 3, 2011

Not without my cap!








गेल्या महिन्यातली गोष्ट.
तरूला नवी टोपी घेतलेली.
त्याला ती एवढी आवडली,
कधी बघावं तेंव्हा
तरू टोपी घालूनच असायचा.
अंघोळ करताना
आणि झोप लागल्यावर फक्त
तो टोपीशिवाय दिसायचा.
मऊ होती टोपी.
निळ्या, हिरव्या,जांभळ्या रंगाच्या
एका जाडशा दोरीला वर्तुळाकारात
फिरवत फिरवत
तयार केली होती ती
कुणा कलाकारानं!
ती घालून घरात तो फिरायचा.
अंगणात खेळायचा.
त्याच्या डोक्यावरून कुणी
गमतीने टोपी काढलेली
त्याला आवडायचं नाही.
त्याचे सुंदर,मऊ केस
बघायची सवय झाली होती.
ही टोपी कुठनं आली मध्येच
असं वाटत रहायचं.
धुवायला घेतलेली सुध्दा त्याला चालेना.
रडून मागायचं कळायला लागलंय त्याला आता.
ओली तर ओली पण टोपी हवी.
कसं वेडं व्हायला होतं ना एकेका वस्तूने.
हसायलाच यायचं खरं तर
त्याचं हे वागणं बघून.
तो झोपल्यावर टोपी धुता यायची.
त्या दिवसात मी तरू म्हणून जी चित्रं काढली
ती सगळी त्या टोपीचीच चित्रं आहेत.
मला मात्र सवयीनं त्या टोपीतला
त्याचा तो हसरा चेहेरा दिसत राहतो.
ग्रेटुली तरुली!!