Thursday, October 29, 2015

रस्त्यावर झोपलेला उंदीर


खूप पूर्वी म्हणजे तरू छान बोलू लागलेला तेंव्हाची गोष्ट.
अगदी सक्काळी पुण्यात कारमधून फिरताना तरुला रस्त्यावर
एक उंदीर पडलेला दिसला.तो अर्थात जिवंत नव्हता.
त्यावेळी तरुला जगणं मरणं
हे काही माहितच नव्हतं.

‘बाबा,उंदीर.’तरुने दाखवलं.
‘हो’
‘बाबा,तो काय करतोय तिथं?’
राहुलला अचानक काय बोलावं ते कळेना.
गाडी वेगाने पुढे नेत तो म्हणालेला,
‘झोप लागली वाटतं त्याची.’

घरी येईपर्यंत तो त्याच गोष्टीचा विचार करीत होता.
आणि मग दिवसभर काय काय विचारीत राहिला.

‘असा कसा रस्त्यावर झोपला?
त्याचं घर कुठे आहे?
मग कधी उठेल तो?
त्याला गाडीच्या आवाजाने जाग कशी येत नाही?
त्याची आई कुठे आहे?
.........
तरुचे प्रश्‍न संपतच नव्हते.


गेल्या वर्षी तरू मला सांगत होता,
‘आजोबा,मला माहिताय,
देवाघरी जाणं म्हणजे काय असतं.’
तरू आता पाच वर्षांचा होता.
‘ते असं म्हणतात फक्त.म्हणजे कोणी
मरतं तेंव्हा, तो देवाच्या घरी जातो.
खरं म्हणजे तो परत कधीच येवू शकत नाही मग.’
त्याला ते माहितच होतं. तो मला सांगत होता.
विचारत नव्हता.