Thursday, December 9, 2010

ती शीळ ओळखीची...


तरू अगदी पहिल्यांदा मला भेटला,
त्यावेळी मी शीळ वाजवून त्याचं मनोरंजन केलं होतं ,
हे मला चांगलंच आठवतंय.
तो त्याचा जन्मदिवस होता.
त्यानेही ओठांचा छान चंबू करून
माझ्या बरोबर शीळ वाजवण्याचा
प्रयत्‍न केला होता.
आतासुध्दा फोन करताच मी शीळ वाजवतो
आणि तरू ओळखतो,
‘आजोबांचा फोन आहे’
त्याची शीळ मला ऐकू येते.
चांगले तीन चार प्रयत्‍न ऐकू येतात.
आता समजतंच की, तरू शीळ वाजवतोय म्हणून.
आणि मग ती मंजूळ आवाजातली हाक ऐकू येते,
आणि मनात पुन्हा पुन्हा वाजत राहते,
"हेलो आज्योबाssss,!!"

तरुला शाळेत जायचंय..





तरू आज दिड वर्षाचा झाला.
गेल्या दोन महिन्यात
तो एवढं काय काय बोलतोय,
खूपच मजा येतेय त्याला ऐकताना.
एक म्हणजे
त्याला किती कळतंय ते समजतंय त्यामुळं.
आणि दुसरं म्हणजे
त्याच्याशी चक्क गप्पा मारता येवू लागल्यायत.
हल्ली तो स्वत:ला मी म्हणायच्या ऐवजी
तरू म्हणून वाक्य बनवत असतो.
म्हणजे,"तरुला झोपायचंय",
"तरुला शाळेत जायचंय " वगैरे.
सगळी मुलं दप्तर घेवून शाळेत जातात,
दप्तरात पुस्तकं असतात,
हे त्याला चांगलं माहित आहे.
बाहेर गेल्यावर शाळा दिसताच
त्याची मागणी सुरू होते.
त्याला आणि खरोखरच
वाचायचं असतं भरपूर.
कुठल्या पुस्तकात काय काय आहे
हे त्याला माहित आहे!
भिंतीवर काढलेल्या आंब्याच्या झाडाजवळ जावून ,
हातात पुस्तक घेवून बसतो
आणि म्हणतो,
"तरू झाडाखाली पुस्तक वाचतोय."

Friday, November 19, 2010

रोज सवेरे एक टमाटर ..




माहित नाही का पण
टोमॅटो तरुला खूपच आवडतं.
लाल आकर्षक रंगामुळे
स्वयंपाक-गृहात
पहिलं लक्ष टोमॅटोकडे जातंच.
बाजारातही हिरव्या भाज्यांमध्ये
टोमॅटोच मॉनिटर.

स्वच्छ धुतलेल्या टोमॅटोला
एक छोटसं दार करून दिलं की
आंब्याएवढ्याच आवडीने
तरू टोमॅटो संपवतो.

हल्ली आईबरोबर बाजारात गेल्यावर
पहिली उडी टोमॅटोवरच पडते मग.

आईने तरूची आवड बघून
गॅलरीत लावलं टोमॅटोच झाड!
सांगत राहिली आणि,
"तरुली, हे कसलं झाड माहितै का,
टोमॅटोचं!"
तरू रोज बघत होता
झाड मोठं होताना.
झाड लवकरच मोठं झालं.
त्याला फुलं आली.
आणि टोमॅटोपण आली.
पण ती होती
सगळी हिरवी हिरवी.
तरुला नक्कीच प्रश्‍न पडला असणार,
‘असं कसं,हे कुठं टोमॅटो आहे?’
आईला ठाऊकच होतं ते.
ती सारखी तरुला सांगायची,
"तरुली,मोठी झाली की
टोमॅटो सगळी लाल लाल होणार.
मग ती तरुला खायला मिळणार."

एके दिवशी,
खरंच मिळालं की
झाडावरचं टोमॅटो,
तरुला.

अशा प्रकारच्या किती तरी गमती सांगायच्यायत.
तुम्ही ऐकताय ना?

Wednesday, November 17, 2010

हे चित्र कोणी काढलंय ?


तरुला हात,पाय,डोळे अशी
शरीर-ओळख करून दिल्याला खूप दिवस झाले आता.
अलिकडे जरा पुढची पायरी सुरू आहे.
म्हणजे मूठ,चिमूट,तळहात,तळपाय वगैरे.
कालचीच गोष्ट,
रुपाली तरुला आपला तळहात दाखवत होती.
तरुने तो नीट बघितला आणि
तळ्हातावरच्या रेषा बघून तो हसत महणतो कसा,
"हे चित्र आहे."
मजाच आली मग.
रुपालीने नंतर त्याच्याही हातावर
असंच चित्र कसं आहे हे त्याला दाखवलं.

Monday, November 15, 2010

आकाशात उडायचंय..




तरूचं घर आहे पाचव्या मजल्यावर.
गॅलरीत उभं राहिल्यावर
पक्षी अगदी जवळून उडत जाताना दिसतात.
त्यांना तिथे बघत राहणं
हा तरुसाठी आनंदाचा विरंगुळा आहे.

कितीतरी पक्षी त्याच्या ओळखीचे आहेत.
बाजुलाच पाण्याचा एक प्रवाह असल्याने
बगळे,पान-कोंबड्या,बदकं,
कावळे,खंड्या हे दिसत राहतात.
घराच्या जवळ कबुतरं,पोपट
यांचे थवे सारखे फिरत असतात.
वट-वाघळं उंचावरनं, हजारोंच्या संख्येनं,
शिस्तीत कुठंतरी जात असतात संध्याकाळी.
आकाशात त्यांचा एक रस्ताच तयार होतो त्यावेळेपुरता.
आणि घारींच्या वर्तुळांवर नजर फिरवता फिरवता
मानेचा आपोआपच व्यायाम होतो.
ओढ्यापलिकडच्या कुरणात चरणार्‍या
गुरांचं निरिक्षण सुरु असतंच.

आतापर्यंत तरू हे सगळं बघत होता.
कधिमधी कबुतराला हाक मारणं वगैरे चालायचं.
आता तो इतकं वेगवेगळं बोलायला लागलाय,
परवा म्हणाला,
"तरुला आकाशात उडायचंय!"
आपण यावर काय बोलणार?

Thursday, November 4, 2010

तरूरारू आणि आनंदाचे झोके





झोके घेताना
फक्त आपणच मागे पुढे होत नसतो
तर
मनात विचारांचाही हिंदोळा सुरू असतो.

तरूच्यासोबत झोपाळ्यावर बसण्याची मजा
शब्दात कशी व्यक्त करावी?

किती गमती असतात
करण्यासारख्या,
नाही?
पण आपण
उगीचच दुर्मुखलेले होत असतो.
मुलांच्याबरोबर पुन्हा पुन्हा
लक्षात येत राहतात,
लहान लहान आनंदाचे
मोठे मोठे झोके!

‘माझी पण गाडी!’




तरू रोज बाबांना गाडीवर बसलेलं बघतो.
बागेत गेल्यावर कितीतरी गाड्या
वाटच बघत असतात तरूची!
हो.
आणि त्या असतात वेगळ्याच.
बदक,घोडा,वगैरे..

आवाज जरा स्वत:ला करावा लागतो.

श्रीमंती




`छ्न्न, खळ खळ, छन्न
ढुम पट ,ढुम
लेझीम चाले जोरात ..'

तरुने पहिल्यांदाच बघितला
लेझीमाचा खेळ
त्या दिवशी.
स्वारी जाम खूष झाली.
तेही खेळणारे सगळे मावळ्याच्या वेषात.
आणखीच मजा वाटली असणार.

असे खेळ, असे क्षण
किती महत्त्वाचे असतात नाही?
आयुष्याला श्रीमंती येते त्यांमुळे!

जत्रा,उत्सव,बाजार,प्रदर्शनं..
सहली,देवळं,भजन,कीर्तन..
आणि हो,एक राहिलंच की,
..शाळा,सगळी पर्वणीच असते
मुलांसाठी.

They make the life more interesting.

आईचे केस मोठे मोठे



तरू ‘बाबा’ म्हणायला शिकला आणि
नंतर खूप दिवस झाले तरी
‘आई’ मात्र म्हणेना.
रुपालीला कधी एकदा
त्याच्या तोंडून ‘आssई’ हाक ऐकतेय
असं झालेलं.
आई म्हणायला लागला
आणि तरू खूपच गोष्टी बोलायला लागला.
अगदी नकळत तो वाक्य बनवू लागला.
गाणी म्हणू लागला.
एके दिवशी गात होता,
"आईचे केस मोठे मोठे!"

त्याला बरंच कळत होतं की!

Sunday, October 31, 2010

रक्षाबंधन


२००९ मध्ये
पाच ऑगस्टला होती नारळी पौर्णिमा.
तरुसाठी एक छान, छोटीशी,
गुलाबी रंगाची राखी आणलेली.

ओवाळताना त्याचं लक्ष होतं बरोबर.
गेल्या दोन महिन्यात तरुला बघत होतो.
शांतपणे सगळं निरिक्षण करायचं,रडायचं वगैरे नाहीच
.त्याचा स्वभाव आवडत होताच.
खूपच मजा येत होती.

तरूशी आता आमची
चांगलीच ओळख झाली होती जणू.
आम्ही महिन्यांच्या भाषेत
आमचा सहवास मोजत होतो.
पण कधी कधी वाटतं,
ह्याला तर काहीच नवीन वाटत नाही.
आम्ही आधिचेच जोडलेले आहोत.
हे वेगळंच बंधन आहे!
गुलाबी,नाजूक,मऊ,..

एक होती चिमणी, ..







तरुला गोष्ट सांगण्याची केवढी हौस आहे मालनला!
चिमणी आणि कवळ्यांचे आवाज ऐकत ऐकत,
अंगणात सुरू व्हायचा गोष्टीचा तास.
लहान मुलांचं कळत नाही का पण
भारी जमतं तिच्याशी.

तरुला दोन महिने होण्याआधीचे
या दोघांचे गोष्टीत रंगून गेले असतानाचे फोटो बघून
मला नेहमीच खूप आश्चर्य वाटतं.
एवढ्याशा तरुला गोष्ट कळलीच आहे की काय,
अशी शंका यावी असे सुंदर भाव आहेत त्याच्या चेहेर्‍यावर!

पुन्हा पुन्हा तीच गोष्ट तेवढीच कशी रंगते?
त्याच त्या सुंदर जागा..
‘दारावरची टकटक’,
‘चिऊताईचं हात दाखवून,"थांब" म्हणून सांगणं’

शब्द नक्कीच नव्हते कळत
पण त्या ठराविक अंतराने होणारे
हातवारे आवडत असतील.
‘टक टक,थांब ह्या आवाजाची
गंमत वाटत असेल.

आता तर तोच ही गोष्ट तिला ऐकवतोय.
म्हणजे त्यात शब्द भरतोय.
key words!
चिऊताई,कावळेदादा,
शेणाचं,मेणाचं,पाऊस..असे.

तो आता तिला ‘मालन आजी’ म्हणू लागलाय.
फारच मजा वाटते हे फोटो बघताना.

या गोष्टीतलं
चिऊ आणि काऊच्या घरातला फरक,
त्यांचं एकमेकांशी विचित्रं वागणं,
मनात कसेतरीच भाव
निर्माण करीत असतं.
गोष्टी अशाच का असतात?

Tuesday, October 26, 2010

झिम्मा





झिम्मा हा किती गमतीचा खेळ आहे नाही?
आपल्या शरीराचा तोल आणि ताल सांभाळत
गाणं म्हणायचं आणि टाळ्या देत घेत नाचत रहायचं!
मला खूप मजा वाटते अशा टाळ्या वाजवत गाताना.
लहानग्या तरूला नुसतं घेवून बसण्यापेक्षा त्याची
काही करमणूक करत बसायचो आम्ही.

तो अडीच-तीन महिन्याचा असताना तरुबरोबर झिम्मा
खेळायला लागलो.
आमच्या टाळ्या वाजवणं तो बघत होताच.
त्यानेही या खेळात रस घेतला.
तोही हात हलवू लागला.तालात.
त्याच्या बंद मुठीची टाळी हातावर घेताना केवढी मज्जा वाटली.

‘तरू झिम्मा खेळतो’ असं मी सांगायला लागलो ज्याला त्याला.
कुणाला ते खरं वाटत नसे आणि अजूनही वाटत नाही.
मला आणि तरुला मात्र नक्की माहीत होतं ते!
त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं ते.
खरं, मुलांच्या डोळ्यात किती काय काय दिसत असतं.
सगळं समजून घ्यायला हवं.

माऊ ,माऊ,आमची माऊ!





आज आहे तरुलीच्या मावशीचा वाढदिवस.
सव्वा वर्षाच्या तरुनं चक्क
गाणं म्हटलं तिच्यासाठी
आणि ते ही फोनवरनं.
‘माऊ ,माऊ,आमची माऊ!’

शब्दांशी खूप लवकर दोस्ती झालीय त्याची.
आता स्वत: छान वाक्यं तयार करायला लागलाय.
महिन्यापूर्वीच तो एक गाणं शिकला..
‘बाबा,बाबा,आमचा बाबाsss’
(‘नकोरे बाबा’ या प्रसिध्द बालनाट्यातलं)
आता यात स्वत:च काही बदल करून
तो त्याला हवं तसं गाणं तयार करून गातो.
म्हणजे, ‘आई,आई,आमची आई’,‘मामा, मामा,आमचा मामा.’ असं!

तृप्ती मावशीला तो ‘तुपामाऊ’ म्हणतो.
मावशीबरोबर त्याची अगदी गट्टीच आहे.
मावशी कधी आठवड्याभरानं घरी आली
तर महाशय तिला झोपूच देत नाहीत.
मावशी तो लहान असताना रात्र रात्र त्याला
जवळ घ्यायची तेंव्हा तो तिचा हट्ट असायचा.
दुसर्‍या कुणी घ्यायच्या आधी,ती धावत जावून घ्यायची तरुला!

Sunday, October 24, 2010

कोवळे क्षण


लहान बाळाचं बघणं,हसणं,दिसणं
हे आणि हेच असतं सगळ्यांच्या मनात
त्या पहिल्या काही दिवसात.
ते शानुलं,छकुलं बाळ प्रत्येकालाच जवळ हवं असतं.
झोपलं असलं तरी त्याचं झोपेतलं हसणं बघण्यासाठी
त्याच्याकडे नजर लावून बसतात सगळे.
त्याचं भुवई उडवणं,जांभई देणं,मान हलवणं,
सगळ्यावर चर्चा होत असते.
त्याचा मऊ मऊ स्पर्ष
हवा हवासा वाटत असतो.
त्याच्या मुठीत बोट देवून बसावंसं वाटत असतं.
आईसाठी ते सगळे कोवळे क्षण
किती सुखाचे असतील नाही?

Thursday, October 21, 2010

बिन घड्याळाचे दिवस


तरुचा जन्म नऊ जूनचा.
०९/०६/०९.
मृगाचा पाऊस यावा तसा आनंद झाला आम्हाला.
मला चांगलं आठवतंय,
हॉस्पिटलच्या खिडकीतून तरुबाळाला घेऊन
मी मावळतीकडनं येणारे
आणि
अतिशय वेगाने पूर्वेकडे निघालेले
ढग बघत बसलेलो.
कितीतरी वेळ.
ढगांच्या बदलत्या आकारांमध्ये
मला कित्येक त्रिमित चित्रं दिसत होती.
मध्येच
तरूचा खूप वेळ न्याहाळून बघितलेला चेहेरा
पुन्हा पुन्हा
बघत होतो.
किती लाल- गुलाबी,नाजुक होता तो!
कपाळावर गंध लावावा तशी एक गुलाबी जन्मखूण होती.
दोन्ही पापण्यांवर तर तो रंग छानच शोभत होता.
त्या आठ दिवसात आम्ही एकटक त्याच्याकडेच बघत होतो.
जणू सगळी घड्याळं बंदच होती काही दिवस.

Wednesday, October 20, 2010

राष्ट्रकूलनंतरची चर्चा!


नुकताच चालायला शिकला असला
तरी चालण्यापेक्षा तरूला धावणंच जास्त आवडतं.
त्यामुळं सारखं त्याच्या सोबत रहावं लागतं.
आणि तो नेहमीच आपल्यापेक्षा वेगात धावतो!
त्या दिवशी बाबाला हरवलंच त्याने.
हे छायाचित्रं आणखी काय सांगतं?

राष्ट्रकूलमध्ये आपल्याला आणखी एक सुवर्ण पदक सहज मिळणार होतं!
तरूची निवड न केल्यामुळेच ते हुकलं!

Tuesday, October 19, 2010

तरुला दिसलं फुलपाखरू


तरुला गंमत वाटावी म्हणून
आम्ही भिंतीवर चित्रं काढायला लागलो.
तो बघत असताना, त्याच्या देखत.
भिंतीवर रंग चढू लागला.
पतंग,बैल,बदक असं बरंच काय काय आकारत होतं.
गवत,फुलं,फुलपाखरं..
तरुने फुलपाखरू चित्रातच पाह्यलं पहिल्यांदा.

आता बागेत फुलांवर स्वैर उडणार्‍या
फुलपाखरांना बघून
त्यांच्या उडण्याची तो नक्कल करतो.
आणि ती सुध्दा त्याला पुन्हा पुन्हा दिसतात
हे एक विशेषच.

‘तरूरारू’आणि ‘तलाव’


राधानगरीच्या तलावाजवळ तरू,तरुचे आई बाबा.

तरुने पहिल्यांदाच ऐकला ‘तलाव’ हा शब्द त्या दिवशी.
रोज नवा शब्द ऐकला की तो तोंडात घोळवत ठेवायचा,
त्या शब्दाचं पारायण करायचं असं सद्या सुरू आहे.
तलाव..तलाव..तलाव
तलाव चांगलाच समजला त्याला.
आणि चित्राच्या पुस्तकातला तलाव बघून त्याला कोण आनंद झालेला!

चित्रातल्या गोष्टी बाहेर बघायच्या
आणि बाहेर बघितलेल्या गोष्टी चित्रात बघून
टाळ्या वाजवायच्या हा मोठाच आनंद आहे.

मला वाटतं,
चित्रं,निसर्ग बघून आनंदित होणं,
हे सुध्दा कुणीतरी मुद्दाम शिकवावं लागतं.
चॉकलेट,खेळणी,याच्या पलिकडे असायला हवी आनंदाची उडी!

Monday, October 18, 2010

मलासुध्दा रंगवता येतं!







आम्ही दरवर्षी आमचा आम्ही
घरीच तयार करतो गणपती.
मातीचा. छोटासाच.
खूप मजा येते.
नंतर विसर्जनही घरीच करतो.
तीच माती पुन्हा वापरता येते.
मुख्य म्हणजे मिरवणूकीच्या गोंगाटातून सुटका होते.
खूप मजा येते.

गेल्या वर्षी गणपतीला रंग देताना तरू बघत होता सगळं.
नीट लक्ष होतं त्याचं.
तो होता तीनच महिन्यांचा.
त्याला बाजुला झोपवून
त्याच्याकडे बघत बघतच
मी कुंचला फिरवत होतो.
हळुवारपणे.

लहान मुलाच्या शेजारी असण्याने
किती वेगळे होतो आपण!

या वर्षी मामाने आणि मावशीने रंगवला गणपती.
तरुसाठी मी मातीचा बैल केलेला.
ओल्या मातीचा तो बैल उभा राहीना.
मग आम्ही त्याला छानसं बसवलेलं.

तरूने केलीच की सुरुवात रंगवायला!
हळुवार रंग देणारे तरुचे हात
‘निर्मिती’चा आनंद घेत होते हे नक्कीच.

Saturday, October 16, 2010

young member of `the laughing club'!


Taru hears the laughters every morning from the garden nearby.
He enjoys that for sure.
His day always starts before the rising sun,`soory mama' in his words.
Mornings are really `mango mornings',
equally delicious
with this young member of the laughing club in our family!!

संशोधन




कसं कळतं मुलांना रोज नवं नवं काही
न शिकवता कुणी मुद्दाम ?
त्यांचं संशोधन सुरुच असतं दर क्षणाला.
किती अभ्यास करतात मुलं
दिसलेल्या प्रत्येक गोष्टीचा!

त्यांच्या नजरेतून नाहीच सुटू शकत काही.

वार्‍याने उडणारी पानं बघून
एक पान
वार्‍यात धरून उडवण्याचा प्रयत्‍न करणार्‍या
तरूला बघून मला फारच मजा वाटलेली.

ऊन आणि सावलीचा अभ्यास करत तो
पुन्हा पुन्हा ऊन्हात जावून पायाला चटका बसला की
पुन्हा सावलीच्या आश्रयाला येत
‘हे असं काय होतंय?’
असा चेहेरा करत होता.
आणि ते बघून आम्हाला त्याच्या मनातलं ऊन स्पष्ट दिसत होतं.

मुलांना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी तेवढी शांतता आणि संधी मात्र मिळायला हवी. नाही?

Thursday, October 14, 2010

धा धिं धिं धा




पहिल्या पंधरा दिवसातच तरूने तबला ऐकला.
दिड महिन्यात त्याने तबल्याला दाद दिली.
आचरेकर सर तबला वाजवत होते.हा लक्षपूर्वक ऐकत होता.
सरांनी समेवर येत तबला वाजवणं थांबवताच
तरू त्यांच्याकडे बघत किती गोड हसलेला!

तृप्ती तबल्याचे बोल म्हणते आणि तो संमोहीत होतो.

तबल्यावर थाप मारणं सुरू असतं.
कधी कधी जमिनीवर किंवा मांडीवर ठेका धरलेला असतो.

बोटं शिवशिवतात आणि ती असतात मात्र इवलिशी!!

पुस्तकप्रीती




अगदी सहाव्या महिन्यातच
तरू मोठ्या माणसांप्रमाणे पुस्तकं चाळू लागला.
तेंव्हा खरंच खूप आश्च्रर्य वाटलं.
प्रत्येक पान इतकं निरखून बघतो तो की त्याच्याकडे बघतच रहावं आपण.
आता तर सगळी पुस्तकं त्याला चांगलीच आवडू लागलीयत.
फिरायला जातानाही पुस्तकं सोबत हवी असतात.

चेंडू की पुस्तक?


शाळेतल्या मुलांना नेहमी त्रास देणारा हाच तो प्रश्न!
धावण्याची इच्छा असताना चेंडूपेक्षा आणखी काय आवडणार?
एक वर्षाच्या तरूला हाच प्रश्न पडलाय का?