Saturday, January 26, 2013

पक्ष्यांचे डोळे



‘पक्ष्याचा डोळा’ वगैरे म्हटलं की अजूनही आपल्याला
अर्जुन वगैरे आठवतो.पण अहिंसेच्या विचारांबरोबर
आता या महाभारतातल्या गोष्टी अगदी नाही वाटत
ऐकाव्याशा.तसंच मला ती म्हण नाही ऐकवत..कुठली..
म्हण नव्हे वाक्‌प्रचार..‘एका दगडात दोन पक्षी मारणे’.
असो..सांगायचंय दुसरंच काहीतरी..
त्या दिवशी फोन होता तरुचा;
"पप्पा आजोबा,पक्ष्यांचे डोळे तर
किती बाजुला असतात ना..अगदी गालावर..
(मला हे खूपच आवडलं..गालावर..मला हे अजून
कधी सुचलं नव्हतं.)
"हो.बरोबर आहे.मग?"
"मग त्यांना समोरचं कसं दिसतं?"
प्रश्‍न तर बरोबरच होता.
या वर्षी त्यानं नाटकात कावळ्याचं काम केलं
हे मी तुम्हाला सांगितलंच नाही ना?
नंतर विस्तारानं सांगायला हवं त्याबद्द्ल.
तर पक्ष्यांविषयीचं चिंतन सुरू असणार सतत.
आणि त्यातूनच हा प्रश्‍न सुचला असावा.
"अरे,त्यांची मान कशीही वळते ना,
त्यामुळे मान वळवून ते हवं तिकडं
बघू शकतात.समोर सुध्दा."
त्याला ते पटलंच नीट.
मग लगेचंच ते त्याने रुपालीला छान
समजावून सांगितलं.
पक्ष्यांना समोर बघायला येणार नाही या काळजीनं
त्यानं तो प्रश्‍न विचारला होता.
मला ही करुणेची दृष्टी फार महत्त्वाची वाटतेय.

Friday, January 25, 2013

‘चित्रकार’


"हल्ली त्याच्या छोट्याशा आणि कमी वेळेच्या शाळेत
जाताना तरुला उत्साह तर वाटत नाहीच, उलट रडायला
मात्र येत असतं रोज.मग त्याला रोज रोज समजवायचं तरी
किती हा प्रश्न रुपालीला पडतो.
"हे बघ तरू, अरे शाळेत गेलं तरच कळतं सगळं,
शहाणं होता येतं..डॉक्टर वगैरे शाळेत जावूनच होत येतं."
....असं काय काय..!
त्या दिवशी एका निवांत क्षणी तरू आईला सांगत होता,
"आई,मी मोठा झाल्यावर ‘चित्रकार’ होणार आहे."
"अरे व्वा, छानच."
त्याच्याकडून हे काही ती पहिल्यांदाच नव्हती ऐकत.
त्याच्या मनाचा प्रवास ती नेहमीच शांतपणे समजून घेते.
"आई,पण मला तर आधीच छान छान चित्र येतात काढायला"
हे सुध्दा रुपालीने ऐकलेलं पूर्वी...
पण आज तो काही तरी वेगळंच गणित मांडत होता,
"मग मी कशाला जावू शाळेत ना?"
त्याचं बोलणं अगदीच काही चुकीचं नव्हतं!
रुपालीने मग मावशीचं उदाहरण देवून
"चित्रं आणखी चांगली येण्यासाठी शाळेत जावंच लागतं"
असा शाळेच्या बाजूने जोर लावला.
थोडा वेळ शांततेत गेला खरा.
मग तरूने आणखी एक डाव मांडायला सुरुवात केली.
"आई,तू पण शिक ना चित्रं काढायला."
हो मी पण शिकणार आहे ना."
"मग तू पण बस ना शाळेत माझ्याजवळच.
आपण दोघं ‘चित्रकार’ होऊया!"
यावर मात्र रुपालीची कुठलीच ‘शाळा’ चालली नाही"
मोठ्याने हसून विषय बदलण्याशिवाय आणखी
कोणता पर्याय होता?