Tuesday, August 21, 2012

कोडं



तरुला कोडं म्हणजे काय असतं हे किती लवकर कळलं!
कोडी घालणं म्हणजे काय,ती बनवून घालायची कशी
आणि कोडी सोडवायची कशी हे सुद्धा त्याला अवगत झालंय!
तो स्वत: कोडी तयार करतोय.कोडी विचारतोय.
तो त्याच्यासाठी सुंदर खेळच झालाय.
फोनवरून संवाद साधण्याचा तो एक विषय झालाय.
"आजोबा,कोडी घाला.." असं सुरू होतं मध्येच.
कधी आपण घालत असलेलं कोडं ओळखून
ते आणखी कसं घालता आलं असतं
हे सांगतो तेंव्हा तर खूपच मजा येते.
म्हणजे मी जर सुरू केलं की,"मी एक पक्षी आहे.
माझी मान लांब असते. ती निळी असते.मला तुरा असतो.
आणि माझी शेपटी आहे तिला पिसारा म्हणतात."
एवढं सांगितल्यावर त्याने ओळखलेलं असतं कोडं.
पण तो मग सांगतो...
"आणि शेपटी फुलवता येते.मिटवता येते.
पाऊस पडायला लागला की मी पिसारा फुलवून नाचतो."
मग मी म्हणतो,"हां,तर मी कोण?"
"मोर!"असं तो आनंदानं ओरडतो.
"आजोबा,अवघड घाला ना"अशी मागणी तो करू लागतो.
पक्षी,झाडं,गाड्या,वस्तू,पदार्थ,व्यक्ती,रंग,..
अशी वेग्वेगळी नवी कोडी सुचत जातात मग.
खेळ संपता संपत नाही.

मी नवीन कोडी तयार करण्याच्या विचारात गढलेला असतो खूपदा!

Friday, August 3, 2012

अंक संपतात!


बोटं मोजत लहान लहान गणितं करायला येतात आता तरुला.
पण ती सगळी सहाच्या आसपास असायला हवीत.बेरीज,वजाबाकी
कळायला लागलीय.रुपाली एकदा म्हणाली "पुढे खूप सारे अंक असतात अरे..
अंक संपतच नाहीत."
तरुला हे फारच गमतीचं वाटलं.
रुपालीनं मग शंभर,हजार वगैरे गोष्टी सांगितल्या.
आणि त्याच्या पुढे अंक असतोच हे सांगितलं.
तरू म्हणाला ते मजेशीर होतं.तो म्हणालेला,
"मला तर सहापर्यंतच येतं.मोजता नाही आलं तर अंक संपतात!"
त्यानंतर काही दिवस जो भेटेल त्याला तरुचा एकच प्रश्‍न होता,
"तुम्हाला कितीपर्यंत अंक मोजता येतात?"