Thursday, October 24, 2013

कंपनी कल्पनेची!

ज्या निरागसतेने तरू त्याच्या डोक्यातल्‍या कल्पना आपल्‍याला
सांगत असतो ती बघून निरागसता इतकी निरागस कशी असू शकते
याचं जरूर आश्चर्य वाटत राहतं.
कालचीच गोष्ट,अर्थात मला रुपालीकडून कळलेली.
दोघं बसून काही कागदाचं काम करत होते.
कागद,गम,सेलो-टेप,कात्री असा सगळा पसारा..
अचानक तरू सांगायला लागला,
"आई,गमच्या कंपनीमध्ये खूप मोठे मोठे ‘मिक्सर’ असणार.
त्यामध्ये ते खूप सार्‍या सेलो-टेप टाकत असतील
आणि त्याचा मग गम तयार करत असतील.
हो ना?"

काय बोलणार आता?
गमची कंपनी असा काही उलटा उद्योग करीत नसेल हे नक्कीच.
तरूची कल्पनेची कंपनी सतत नव्या नव्या कल्पना तयार करत असते.
तरुची ‘कंपनी’ म्हणजे करमणूक!
   

Tuesday, September 24, 2013

‘तार्‍यांची चित्रं ’


तळहातावरच्या रेषा बघून ‘चित्र ! ’
असं आनंदानं ओरडणारा तरू आठवतो आणि
खूप गंमत वाटत राहते.इथे तिथे चित्रं दिसत असतात त्याला.
त्याची ही नजर सुंदरच आहे.

काही दिवसांपूर्वी त्याच्याबरोबर रात्रीचं आभाळ बघताना
त्याला आम्ही चांदण्य़ा दाखवत होतो आणि त्याला ते नीटच
समजत होतं.पतंग,माणूस,हरीण,त्रिकोण,चौकोन असे कितीतरी
प्रकार.मग ती रोजचीच करमणूक झालेली.

अलिकडेच तरू रुपालीला सांगत होता,
"आई,दिवसा तारे कुठे असतात माहित आहे?"
"कुठे?"
"त्यांची meeting असते अगं."
आई आणि बाबांच्या नेहमी असणार्‍या
meetings मुळे तरुला meeting हा नुसता शब्दच नाही
तर ती काहीतरी ठरवण्यासाठी वगैरे असते हे सुध्दा
माहित आहे.
"हो? अरेच्च्या!
 तार्‍यांची meeting?"
"ते ठरवत असतात, आज आपण कुठे उभं रहायचं
आणि आज रात्री कसलं चित्र तयार करायचं!"
रुपाली ऐकतच राहिली.काय बोलावं ते सुचेना तिला.
असा विचार कधीच नव्हता केला आपण.
हा असा कसा विचार करतो याचं प्रचंड आश्चर्य तिला वाटलं.
ती त्याच्याकडे किती तरी वेळ कौतुकाने बघत होती.
हसत होती.
आभाळात कुठल्यातरी ढगावर वर्तुळाकार बसून
सगळे तारे त्या रात्रीच्या चित्राविषयी चर्चा करतायत,
असं दृश्य तिच्या डोळ्यासमोर दिसत होतं तिला.

तिचा चेहेरा तिच्या जवळच बसलेल्या तार्‍याच्या
उजेडात न्हात होता एवढं मात्र नक्की!

Monday, September 23, 2013

‘अंतराळवीर मामा’

 तरू एकदा मला म्हणालेला,
"आजोबा,माझा एक मामा scientist आहे.आणि दुसरा मामा अंतराळवीर आहे."
"अरे,हा दुसरा मामा कोण?"
मला खरंच कळलं नव्हतं.
तरुच्या मनातलं ओळखणं सोपं नसतं खूपदा.

"अहो,चां

दोमामा! तो अंतराळातच असतो ना.
मग तो अंतराळवीरच ना?"
मला एकदम पटलंच ते!

Friday, September 6, 2013

कुतुहल


जमिनीच्या खाली काय काय आहे?
आभाळात काय असतं?
पाऊस कसा पडतो?
शाळेत कशासाठी जातात?
हे आणि असे सतराशे साठ प्रश्‍न
विचारताना तरुला पाह्यलंय.
सगळ्याच गोष्टींबद्दल प्रचंड कुतुहल असतं
त्याला.किंबहुना सगळ्याच मुलांना असावं ते.
या प्रश्‍न विचारण्य़ाच्या त्याच्या सवयीमुळं
त्याला किती काय काय माहिताय या वयात!

चार वर्षाचा तरू डायनासोर,त्यांचे शंभर प्रकार,अवकाश,
तारे,लाव्हा,ज्वालामुखी,शरीर-रचना,प्राणी,सगळे महासागर,
समुद्रतळाची गंमत,बघितलेल्या सिनेमांच्या गोष्टी,
विमानं,गाड्या,पाणबुड्या,
अशा किती तरी गोष्टी सांगत असतो.
खरंच वाटत नाही.

शंभराच्या वर पुस्तकं बाळगणारा,चाळणारा
‘वाचणारा’,इतका अभ्यासू छोटा वाचक
मला अचंबित करतो!


 

Wednesday, April 10, 2013

‘तहानलेला कावळा ’


नाटकाच्या मुख्य तालमीपूर्वी अनेक गोष्टी होतात.
कुणाला गाणं म्हणायचं असतं,कुणाला नक्कल करायची असते.
कोण कोडं घेवून आलेला असतो.तर कुणाला ‘आज काय झालं माहिताय..’
या सदरातलं ताजं ताजं काही ऐक
वायचं असतं.
तरुने त्या दिवशी ‘तहानलेला कावळा’ गोष्ट सांगितली.
सांगितली म्हणण्यापेक्षा सादर केली असंच म्हणावं लागेल.
त्याला ‘निसर्गचित्र’नाटकाचं नेपथ्य आयतंच मिळालं होतं.
कसं कोण जाणे पण त्याला काय काय सुचत गेलं.
वेगवेगळ्या ठिकाणी उभा रहात,उडत,पळत,बसत तो गोष्ट सांगत होता.
खूपच गमती केल्या.
"एक होता कावळा.त्याला खूप खूप तहान लागली होती.
पण त्याला पाणीच कुठे मिळत नव्हतं.विहिरीत पाणी नव्हतं.
तळ्यात पाणी नव्हतं.नदीवर गेला तर तिथे पण पाणी नव्हतं.
समुद्रावर गेला तर समुद्रात पण पाणी नव्हतं!"
‘समुद्रात पाणी नव्हतं’म्हटल्यावर त्यालाच हसायला आलं.
पण न थांबता त्याने ती गोष्ट छानच पूर्ण केली.
कावळ्याची युक्‍ती सगळ्यानाच आवडली!  

Tuesday, April 9, 2013

‘कावळ्य़ाचं पिल्लू’


तरू जून मध्ये चार वर्षांचा होईल.
गेली दोन वर्षे तो नाटक कसं बसतं हे बघतो आहे.
खरं तर चार वर्षे बघतोय असंच म्हणावं लागेल.तो सहा महिन्यांचा असताना
त्याने ‘छोटीशी सुरुवात’ हे नाटक बाबांच्या मांडीवर झोपून बघितलेलं.
तो दिड वर्षाचा असताना त्याने ‘बारा विरुध्द एकवीस’ हे नाटक शांतपणे
एकट्याने बसून बघितलेलं.नंतर सहा महिन्यांनी त्यातला एक प्रसंग चक्क
सादर करून दाखवलेला. मागे त्याविषयी मी लिहिलेलंच आहे.‘मन पाण्याचे’च्या
रंगीत तालमीपर्यंत त्याने मुलांबरोबरीने तालीम केलेली.त्यांच्याबरोबर रंगमंचावर
तो वावरलेला.विंग,स्पॉट,ब्लॅकआऊट वगैरे शब्द नुसते कळले नाहीत तर तो ते बोलण्यातून
वापरत होता.या वर्षी तर त्याने पूर्ण तालमी,आणि मुख्य अशा चार प्रयोगांमध्ये तीन ते चार
मिनिटांची अशी असणारी कावळ्याच्या पिल्लाची भूमिका केली.प्रवेशालाच टाळ्या मिळवल्या
आणि नंतर सर्वांनी किती कौतुक केलं त्याचं!
एक नाटक म्हणजे केवढ्या आठवणी!केवढी धमाल!!
दोन कावळ्यांच्या जोडीला असलेलं हे पिल्लू उड्या मारीत
रंगमंचावर येतं आणि बोबड्या बोलात ‘ताssव,ताssssव,ताsssssव!’करीत,
मोठ्या कावळ्यांकडे बघत,त्यांचं अनुकरण करीत,ओरडत,ओरडत
निघून जातं.पिल्लाच्या त्या कोवळ्या, निरागस हाकांनी प्रेक्षागृहात
कावळ्यांविषयी कसं अकृत्रिम प्रेम दाटून येतं हे बघणं हा एक सुंदर अनुभव होता.  

Wednesday, March 13, 2013

सिंहाच्या गोष्टीची गोष्ट



पहाटे चार वाजता ऊठून तरुने मला काय सांगावं?
’पप्पा आजोबा ,आपल्या नव्या नाटकाचं नाव काय ठेवायचं
माहिती आहे?"
"काय?"
"सिंहाच्या गोष्टीची गोष्ट"
"हं?"
"आपलं नाटक आहे ना ‘माणसाच्या गोष्टीची गोष्ट’, तसं."
गेले कित्येक दिवस तरुच्या या नव्या नाटकाची रोज तालीम सुरू आहे.
ती कुठल्याही वेळी आणि कुठेही सुरू होते.गरज आहे ती फक्त त्याच्या
शिवाय आणखी कुणीतरी कलाकार उपलब्ध असण्याची.
काहीतरी उंच ठिकाण बघून तरू(म्हणजे नाटकातला सिंह!)
‘सिंहासनावर’ बसतो आणि समोरच्याला विचारतो,
"काय प्रश्‍न आहे तुमचा?"
या प्रश्‍नाची आम्हाला आता एवढी सवय झालीय आणि इतक्यांदा तो ऐकलाय,
आम्ही सुध्दा तो अवघडात अवघड कसा असेल हेच बघतो.
आणि मग  त्या सिंहाचा चेहेरा बघत बसतो.
किती गंभीरपणे विचार करणं सुरू असतं!
केवढा तरी वेळ शांतता असते. एक ताण वातावरणात भरून राहतो.
आणि मग सिंह त्या प्रश्‍नाचं उत्तर देऊ लागतो.
उदाहरणार्थ-
१.प्रश्‍न: महाराज,माणसं केवढी झाडं तोडतायत! काय करायचं?
 उत्तर:  आपण त्यांना सांगायचं,"तोडू नका झाडं."
 प्रश्‍न:   कुणीही ऐकत नाही.आपली भाषाच त्यांना कळत नाही.मग?
 उत्तर:  तुम्ही काळजी करू नका.मी फॉरेस्ट ऑफिसरला सांगेन आता.

   २.प्रश्‍न: महाराज,पाऊस गायब झालाय.प्यायला पाण्याचा थेंब नाही.
     उत्तर: हत्तींना बोलावून घ्या.ते लांबून पाणी घेवून येतील.
          आणि सोंडेने पाडतील पाऊस!
३.सिंह: हं कोण तुम्ही?
  ससा: महाराज मी ससा आहे.
  सिंह: हं.काय प्रश्‍न आहे ससुल्या?
  ससा: लपायला जागाच नाही.
  सिंह: बीळात राहतोस ना,तिथंच लपायचं
  ससा: असं कसं.गवत,गाजर काहीतरी खायला बाहेर
       पडायलाच लागणार ना.भीती वाटते खूप.
  सिंह: (खूप वेळ कपाळावर अठ्या,भुवया उंचावलेल्या,शांतता..)
       घाबरू नको. मी आहे.

तर हे असं ..
रोज रोज नवा प्रयोग!  

Saturday, January 26, 2013

पक्ष्यांचे डोळे



‘पक्ष्याचा डोळा’ वगैरे म्हटलं की अजूनही आपल्याला
अर्जुन वगैरे आठवतो.पण अहिंसेच्या विचारांबरोबर
आता या महाभारतातल्या गोष्टी अगदी नाही वाटत
ऐकाव्याशा.तसंच मला ती म्हण नाही ऐकवत..कुठली..
म्हण नव्हे वाक्‌प्रचार..‘एका दगडात दोन पक्षी मारणे’.
असो..सांगायचंय दुसरंच काहीतरी..
त्या दिवशी फोन होता तरुचा;
"पप्पा आजोबा,पक्ष्यांचे डोळे तर
किती बाजुला असतात ना..अगदी गालावर..
(मला हे खूपच आवडलं..गालावर..मला हे अजून
कधी सुचलं नव्हतं.)
"हो.बरोबर आहे.मग?"
"मग त्यांना समोरचं कसं दिसतं?"
प्रश्‍न तर बरोबरच होता.
या वर्षी त्यानं नाटकात कावळ्याचं काम केलं
हे मी तुम्हाला सांगितलंच नाही ना?
नंतर विस्तारानं सांगायला हवं त्याबद्द्ल.
तर पक्ष्यांविषयीचं चिंतन सुरू असणार सतत.
आणि त्यातूनच हा प्रश्‍न सुचला असावा.
"अरे,त्यांची मान कशीही वळते ना,
त्यामुळे मान वळवून ते हवं तिकडं
बघू शकतात.समोर सुध्दा."
त्याला ते पटलंच नीट.
मग लगेचंच ते त्याने रुपालीला छान
समजावून सांगितलं.
पक्ष्यांना समोर बघायला येणार नाही या काळजीनं
त्यानं तो प्रश्‍न विचारला होता.
मला ही करुणेची दृष्टी फार महत्त्वाची वाटतेय.

Friday, January 25, 2013

‘चित्रकार’


"हल्ली त्याच्या छोट्याशा आणि कमी वेळेच्या शाळेत
जाताना तरुला उत्साह तर वाटत नाहीच, उलट रडायला
मात्र येत असतं रोज.मग त्याला रोज रोज समजवायचं तरी
किती हा प्रश्न रुपालीला पडतो.
"हे बघ तरू, अरे शाळेत गेलं तरच कळतं सगळं,
शहाणं होता येतं..डॉक्टर वगैरे शाळेत जावूनच होत येतं."
....असं काय काय..!
त्या दिवशी एका निवांत क्षणी तरू आईला सांगत होता,
"आई,मी मोठा झाल्यावर ‘चित्रकार’ होणार आहे."
"अरे व्वा, छानच."
त्याच्याकडून हे काही ती पहिल्यांदाच नव्हती ऐकत.
त्याच्या मनाचा प्रवास ती नेहमीच शांतपणे समजून घेते.
"आई,पण मला तर आधीच छान छान चित्र येतात काढायला"
हे सुध्दा रुपालीने ऐकलेलं पूर्वी...
पण आज तो काही तरी वेगळंच गणित मांडत होता,
"मग मी कशाला जावू शाळेत ना?"
त्याचं बोलणं अगदीच काही चुकीचं नव्हतं!
रुपालीने मग मावशीचं उदाहरण देवून
"चित्रं आणखी चांगली येण्यासाठी शाळेत जावंच लागतं"
असा शाळेच्या बाजूने जोर लावला.
थोडा वेळ शांततेत गेला खरा.
मग तरूने आणखी एक डाव मांडायला सुरुवात केली.
"आई,तू पण शिक ना चित्रं काढायला."
हो मी पण शिकणार आहे ना."
"मग तू पण बस ना शाळेत माझ्याजवळच.
आपण दोघं ‘चित्रकार’ होऊया!"
यावर मात्र रुपालीची कुठलीच ‘शाळा’ चालली नाही"
मोठ्याने हसून विषय बदलण्याशिवाय आणखी
कोणता पर्याय होता?