Thursday, July 5, 2012

पाहुणा ऑक्टोबर!


तरुला आकडे म्हणजे अंक हे
वस्तू मोजण्यासाठी वापरतात हे पूर्वीच कळलेलं आहे.
तरीही दोन महिन्यापूर्वी सहापेक्षा जास्त वस्तू असतील तर
त्या मोजण्‍याचा कंटाळाच करायचा तो. आम्ही तरी कुठं त्याच्याकडून
अपेक्षा करीत होतो?
पण जर कधी मोजले तर गंमत करायचा.
तो मोजायचा आणि आम्हाला हसवायचा.आणि आम्ही हसतोय
म्हटल्‍यावर पुन्हा पुन्हा तोच विनोद करायचा.
तो मोजायचा...
"१,२,३,४,५,६,८,९,१३,१४,१५,१७.१९,३४,..ऑक्टोबर!"
आता अंकांमध्ये हे ऑक्टोबर कुठनं आलं,असं वाटायचं.
मला तर खूपच हसायला यायचं.आणि मग तो पण हसत रहायचा.
त्याला कळायचंच नक्की आपण काय गंमत केलिय ते.
त्या ऑक्टोबरला काय वाटत असेल अंकांच्या गर्दीत?
ते सगळे अंक त्याला,
"ओ पावणं,कंचं गाव म्हणायचं?"
असं तर विचारत नसतील?
तशी दहाची आणि त्याची ओळख असेल म्हणा!



Wednesday, July 4, 2012

किती छान कल्पना आहे ना?



तरूचं बोलणं ऐकून कळतंच की
त्याने हे आपण ‘त्या’ दिवशी जे बोललो होतो
त्याची हुबेहुब नक्कल केलेली आहे.
रुपाली तर म्हणतेच नेहमी
मी बोललेलं मला लवकरच
साभार परत मिळणार आहे.
रुपालीच्याच नव्हे
आजुबाजुच्या सगळ्याच आवाजांची नक्कल करणं
त्याला खूप आवडतं.
त्याने एखादी गोष्ट करावी म्हणून रुपाली त्याला म्हणते,
"बघ हे केलं की मज्जा येणार.किती छान कल्पना आहे ना?"
त्या दिवशी रुपाली त्याला सांगत होती,
"आता अंघोळ करणार ना तू?"
तरुच्या मनात मात्र खेळायचं होतं.
तो म्हणतो कसा,
"आई,आता आपण खेळूया,मग जेवूया,मग पुन्हा खेळूया,मग झोपूया,मग खेळूया...
किती छान कल्पना आहे ना?"
अंघोळीचा घोळ किती छान सोडवला होता त्याने!
त्यातही ‘छान कल्पना’ रुपालीला किती सहज परतवली होती!!