


तरू आलेला शिरगावला गेल्या महिन्यात.
गावची जत्रा होती नेमकी त्यावेळी.
मला पण कधी एकदा तो दिवस उगवतोय असं झालेलं.
तिथल्या त्या खास उजेडात
त्याचा उजळलेला चेहेरा बघायचा होता ना!
देवळाजवळ सगळं गाव जमलेलं.
भजन,दिंडी तर होतीच.
मुख्य म्हणजे खेळण्याची दुकानं!
आम्ही तासाभरात किती खेळणी बघितली!!
आणि काही घरी आणली.
चार फुगे घेतले.वेगवेगळ्या रंगाचे.
तरुला रंग ओळखायला यायला लागलेत आता!
निळा, पोपटी,लाल आणि पिवळा.
तरुने जत्रेतून काय काय खेळणी आणली..
.हं...बैलगाडी,ट्रॅक्टर,हेलीकॉप्टर,भोवरा,
पडघम वाजवणारा वाघोबा,बॅडमिंटनच्या रॅकेटस,
बासरी,पिपाणी आणि भातुकली!
चावी दिली की ट्रॅक्टर मोठा आवाज करत सरळ जायचा.
दोरी ओढली की हेलीकॉप्टरचा पंखा फिरायचाच
पण तिथं छान लाल उजेड दिसायचा.
वाघोबा तर मिनिटभर तडा तडा वाजवत बसायचा.
नंतर काही दिवस आम्ही सगळेच खेळत होतो मग.
भातुकलीमुळे तरू स्वयंपाक करायला शिकला.
भाजी कापून,शिजवून आम्हाला जेवण वाढायला लागला.
चिमटीने हळूच मीठ टाकायचा.
भांडी घासायचा. धुवायचा.
हवेतल्या हवेत नळ सुरु करायचा.
नाटक भारीच होत होतं.
आम्ही दिवसातनं वीसेक वेळा तरी
जेवत होतो त्या दिवसांत.
पोट भरून.
मन भरून!!
No comments:
Post a Comment