Monday, February 28, 2011

‘भारतमाता की जय!’





यंदा प्रजासत्ताकदिनाच्या दिवसात
आमच्या नाटकाच्या तालमी सुरू होत्या.
तरू पहिल्यांदाच
नाटक इतक्या जवळून बघत होता.
खूप मजा येत होती.
कधी कधी नाटकातले संवाद
त्याच्या डोक्यावरनं जात होते.
आणि तेंव्हा
तो सहज विचारायचा,"हा दादा काय म्हणतोय?"
आम्हाला गंमतच वाटत होती त्याच्या बोलण्याची!
नाटकात असलेल्या पंचवीसेक मुलांनी
त्या रात्री झेंडावंदनाची तालीम केली.
सराव केला.

(तरूने स्वातंत्र्यदिनाचं झेंडावंदन पाहिलंच होतं.
ते त्याला आठवलं असणार.
तेंव्हा तो नुकताच बोलू लागला होता.
त्याने त्यादिवशी पहिलं वाक्य तयार केलेलं.
तो म्हणालेला,"झेंडा हलतोय"!)

२६ जानेवारीला सकाळी
आमच्याबरोबर तरू होता
शाळेच्या त्या भव्य सोहळ्यात!
रांगेत उभी असलेली ती सात-आठशे मुलं ,
तिथली कवायत,झेंडावंदन,राष्ट्रगीत,झेंडागीत,घोषणा..
या सगळ्या गोष्टींच्याकडे तो अचंबित होवून बघत होता.
जत्रेतून आणलेल्या वाघोबाचा पडघम
तो आज प्रत्यक्ष बघत होता.
त्याने नंतर तो जवळ जाऊन वाजवला सुद्धा!
नंतर नाटकातल्या मुला मुलींनी
तरुला जवळ येवून किती किती हसवलं!!
चॉकलेट्स दिली.
आजीने तर घरी जिलेबी बनवलेली.
केवढा गोड दिवस होता तो!!!

...अजूनही आठवण होताच
एका हाताची मूठ आवळून
तरू मोठ्याने घोषणा देत असतो,
‘भारतमाता की जय !’

No comments:

Post a Comment